वेल्हे प्रशासकीय इमारतीच्या जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:09 AM2021-07-15T04:09:54+5:302021-07-15T04:09:54+5:30
वेल्हे प्रशासकीय इमारतीसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. ...
वेल्हे प्रशासकीय इमारतीसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. या वेळी प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पोलीस निरीक्षक मनोज पवार आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यांनी वेल्हे प्रशासकीय इमारतीसाठी पाठपुरावा केला असून ऑक्टोबर २०२० मध्ये १५ कोटी ९९ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. या इमारतीसाठी जवळपास ४० गुंठे जागेची आवश्यकता आहे. महसूल विभागाच्या मागणीनुसार पंचायत समिती वेल्हे यांनी जिल्हा परिषदेकडे तीन वेळा प्रस्ताव पाठवलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील हा विषय मांडण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व इतर सदस्यांनी पुढील महिन्यात याबाबत निर्णय घेणार आहोत, असे आश्वासन दिले होते. परंतु जिल्हा उपाध्यक्ष रणजित शिवतरे व वेल्हे पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे दिनकर धरपाळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदे कडून यावर तोडगा निघाला नाही. वेल्हे पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे दिनकर धरपाळे आधीच इतर सदस्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे वेल्हे प्रशासकीय इमारतीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. याबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी वेल्हे येथील जागेची पाहणी केली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय इमारतीच्या संदर्भात जागेची पाहणी केली.