सायंबाच्यावाडीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:00+5:302021-02-06T04:17:00+5:30
प्रशासन सदैव सोबत असल्याचा दिला शब्द ग्रामस्थांनी केली जलसंधारणाची उल्लेखनीय कामे बारामती: सायंबाचीवाडी येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाची उल्लेखनीय कामे केली ...
प्रशासन सदैव सोबत असल्याचा दिला शब्द
ग्रामस्थांनी केली जलसंधारणाची उल्लेखनीय कामे
बारामती: सायंबाचीवाडी येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाची उल्लेखनीय कामे केली आहेत. सध्या वॉटर बजेट प्लसमध्ये असले तरी त्याचे योग्य जल व्यवस्थापन करून त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल व गाव समृद्ध होईल. गावातील ग्रामस्थांच्या ज्या काही अडचणी असतील त्या प्रशासनाकडून सोडविण्यात येतील. सर्व ग्रामस्थांचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सायंबाचीवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.
बारामती तालुक्यात मौजे सायबांचीवाडी येथे शिवारफेरी अंतर्गत श्रमदानातून उभारलेल्या बांधाची, मुरघास प्रकल्प व तलाव सुशोभीकरण व पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी बुधवारी (दि. ३) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. या वेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाऊंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, उपसरपंच प्रमोद जगताप, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शिवारफेरी अंतर्गत केलेली कामे व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून ते बैठकीत म्हणाले की, याबरोबरच समृध्दी गाव योजनेमध्येही भाग घेण्याचे आवाहन करून पाणी फाउंडेशनच्या टीमचेही यापुढे असेच सहकार्य लाभत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या वेळी पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी म्हणाले की, सन २०१८-१९ मध्ये गावामध्ये उपलब्ध पाणीसाठा १०६.७७ कोटी लिटर होता आणि प्रत्यक्षात पाण्याची गरज होती २६९.९२ कोटी लिटरची म्हणजे एकूण १६३.१५ कोटी लिटरची पाणी कमतरता होती. ज्या वेळी गावाने २०१९-२० मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेऊन मशीन व श्रमदानातून झालेल्या २ कामांच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी ४० लाख लिटर पाणीसाठा तयार झाला. यानंतर उपलब्ध पाणी ४२५.९५ कोटी लिटर आणि पाण्याची गरज ३६९.७८ कोटी लिटर म्हणजेच ५६.१७ कोटी लिटर जास्तीचे पाणी झाले.
सायंबाचीवाडी येथील पाझर तलावात साठलेल्या पाण्याची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.
०४०२२०२१-बारामती-०१