जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळेना फर्निचर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:33 AM2018-05-05T04:33:10+5:302018-05-05T04:33:10+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचरचे कामच झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभाग आजही भाड्याच्या इमारतीत आहेत.
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचरचे कामच झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभाग आजही भाड्याच्या इमारतीत आहेत. शासनाकडून गेल्या तीन-चार वर्षांपासून पुण्याला निधी देताना दुजाभाव होत असून, फर्निचरसाठीचा बांधकाम खात्याकडे जमा केलेला १ कोटी ३० लाखांचा निधी राज्यात अन्य कामांसाठी वळविण्यात आला. सध्या ठेकेदारांकडून इमारतीत सुमारे ७ कोटी रुपयांचे फर्निचरचे काम करण्यात आले असून, हा पैसा दिला नाही तर पुढील काम थांबविण्याचा इशारा ठेकेदाराने दिला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सातत्याने नव्या इमारतीच्या उर्वरित कामासाठी आणि फर्निचरच्या कामांसाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. इमारतीचे उद्घाटन होणे आवश्यक असल्याने इमारतीच्या कामांसाठी निधी देण्यात आला आणि फर्निचरच्या कामांसाठी डिसेंबर २०१७ मध्ये पुरवणी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. हे आश्वासन मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराला मार्च २०१८ पर्यंत कामाची आगाऊ रक्कम देण्यात येईल, असे सांगून फर्निचरच्या कामाचे आदेश देण्यात आले होते.
पैसे न मिळल्यास काम थांबवण्याचा इशारा ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली.
अन्य ठिकाणी निधी वळविला
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए आणि बी अशा दोन्ही विंगमधील पाचही मजल्यांवर ठिकठिकाणी खुर्च्या, टेबल, कपाटे आणून ठेवण्यात आली आहेत. तसेच ए विंगमधील पाचव्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाचे कामही जलदगतीने सुरू होते.
शासनाने फर्निचरच्या कामासाठी मार्चअखेरला बांधकाम विभागाच्या खात्यात १ कोटी ३० लाख रुपये सकाळी जमा करण्यात आले. परंतु काही तासांतच राज्यातील अन्य ठिकाणच्या विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याची सबब पुढे हा निधी काढून घेण्यात आला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील फर्निचरचे काम रखडले आहे.