जिल्हा परिषद शाळा अंधारात
By admin | Published: March 31, 2017 11:51 PM2017-03-31T23:51:35+5:302017-03-31T23:51:35+5:30
भारताची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना देशाचे भवितव्य घडविणाऱ्या सामान्यांची जिल्हा परिषद
भिगवण : भारताची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना देशाचे भवितव्य घडविणाऱ्या सामान्यांची जिल्हा परिषद शाळांची वीज महावितरण कंपनीने कापल्यामुळे जिल्हा परिषद शाळा अंधारात गेल्या असल्याचे इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे. वीज कापल्यामुळे ई-लर्निंग, कॉम्प्युटर लॅब तसेच पाण्यासाठी बसविण्यात आलेले आरो सिस्टीमही बंद पडली आहेत.
शाळेत शिकणारी पिढी हे देशाचे उज्ज्वल भविष्य मानले जाते. सामान्य नागरिकांना खासगी शाळेचे शुल्क परवडणारे नसल्याने आपली मुले जिल्हा परिषद शाळेत घालतात. त्याच जिल्हा परिषद शाळांची वीज महावितरण कंपनीने थकबाकी असल्याचे कारण सांगत बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भिगवण केंद्रातील १२ पैकी ९ शाळांची वीज थकबाकीमुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिकविली जाणारी ई- लर्निंग तसेच कॉम्प्युटर सिस्टीम बंद पडली आहे. याकडे जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची गरज असताना कोणताही अधिकारी अथवा जिल्हा परिषद सदस्यही लक्ष देताना दिसून येत नाही. एकतर खासगी शाळांच्या तोडीस तोड देण्यासाठी शाळांना उच्च दर्जाचे साहित्य व शिक्षण देणे गरजेचे असताना रोटरी क्लब आणि लोकसहभागातून मिळालेल्या ई- लर्निंग आणि कॉम्प्युटर वीज तोडल्याने बंद अवस्थेत आहेत. रोटरीच्या माध्यमातून मुलांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे या उद्देशाने बसविण्यात आलेले आरओही वीज कापल्यामुळे बंद पडले आहेत.
सध्या सूर्य आग ओकत असताना आणि उष्णतेचे नवनवीन विक्रम होत असताना याच दिवसात वीज तोडल्याने विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात शिजून निघत आहे. वीजबिल थकण्यासाठी शाळा प्रशासन जसे जबाबदार आहे तसेच वीज वितरण कंपनीही जबाबबदार आहे. कारण शाळांना कमर्शियल पद्धतीने बिल आकारले जात असल्यामुळे ते जास्तीचे बिल भरताना शाळांच्या नाकीनऊ येते.
शाळांचे वीजबिल जिल्हा परिषदने भरण्याची आवश्यकता असताना याविषयी कोणताही निर्णय घेतला जात नाही. तसेच पाठीमागे प्रत्येक शिक्षकाचे पगाराच्या ४ टक्के एवढा सादील खर्च देण्यात येत होता. त्यातून हे वीज बिल भरले जात होते. तो सादील खर्च अचानक बंद केल्याने वीजबिल थकले. काही शाळा लोकसहभागातून वीजबिल भरत आहेत.
(वार्ताहर)
शाळेतील संच पडले बंद
जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख नानासाहेब दराडे यांनी केंद्रातील १२पैकी ९ शाळांची वीज महावितरणने कापल्याचे सांगितले.
तसेच महावितरण शाळांना घरगुती ऐवजी कमर्शियल वीजबिल आकारत असल्याने थकबाकी वाढत असल्याचे सांगितले. तसेच ९ शाळांपैकी ६ शाळांचे ई-लर्निंग आणि कॉम्प्युटर बंद असल्याने त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे सांगितले.
शाळांना दिल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्ती खर्चातून आणि लोक सहभागातून सध्या शाळांनी वीजबिल भरावे, असे सांगितले. तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना याबाबत कळवले असून लवकरच याबाबत ठोस निर्णय घेतला जाणार आहे.
- चंद्रकात उगले,
गटशिक्षणाधिकारी