जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा जाहीर
By admin | Published: April 2, 2017 03:05 AM2017-04-02T03:05:06+5:302017-04-02T03:05:06+5:30
बँक आॅफ महाराष्ट्रासह जिल्ह्यातील अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्याचा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा ४८ हजार ८०७ कोटी
पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रासह जिल्ह्यातील अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्याचा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा ४८ हजार ८०७ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. मागील वर्षापेक्षा तो १६ टक्क्यांनी अधिक आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार हा पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून पतपुरवठा आराखडा प्रकाशन उपजिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला बँक आॅफ महाराष्ट्रच्या पूर्व परिमंडळ विभागाचे परिमंडळ व्यवस्थापक दत्ता डोके, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विक्रम पठारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक काशिनाथ डेकाटे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपसरव्यवस्थापक डी. एस. थोरात पाटील, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आनंद कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक डी. बी. देशमुख आदी उपस्थित होते.
पतपुरवठा आराखड्यात लघुउद्योजकांसाठी ११ हजार ४२० कोटी रुपये, स्वयंरोजगार योजना, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, छोट्या व्यवसायासाठी १२ हजार १८५ कोटी रुपये तरतूद केली आहे.
या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह ४१ बँकांच्या १ हजार ६१७ शाखांचा सहभाग आहे. गेल्या वर्षीपेक्षा एकूण पतपुरवठा आराखड्याच्या १६ टक्के वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)