Corona Virus Pune: आता पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:11 PM2021-04-07T18:11:44+5:302021-04-07T18:34:19+5:30
पहिल्या डोसनंतरही झाली कोरोनाची लागण, पाच एप्रिलला घेणार होते दुसरा डोस
पुणे: एक वर्षभर कोव्हीड कामकाजाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी मार्च महिन्यातच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. ५ एप्रिलला दुसरा डॉस घेण्याचे निश्चित झाले होते. अचानक चार तारखेला रात्री ताप , डोकेदुखी, अंगदुखी जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोना तपासणी करून घेतली. आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
पूर्ण एक वर्षाचा कालावधी डोळ्यांसमोर येऊन गेला. गेले वर्षभर त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सोबत समन्वयाने कोरोना प्रतिबंध व उपचार यासाठी काम केले. रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवा समजून गेल्या एक वर्षात कामकाज पहिले. वारंवार कोविड टेस्ट करूनही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. पण अखेर त्यांना कोरोनाने गाठले.
पवार म्हणाले, सध्या मी गृहविलगीकरणात आहे. तसेच मला लक्षणेही आहेत. मी स्वतःच्या तब्बेतीबद्दल जागरुक असून काळजी घेत आहे. उपचार व तपासण्या सुरु आहेत. कुटुंबाच्या तसेच आपण दिलेल्या बळामुळे व शुभेच्छांमुळे लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा कोरोना मैदानात रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी देखील आपली कोरोना तपासणी करून घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे.