जिल्हा हगणदरीमुक्तीवर होणार शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 01:07 AM2019-03-05T01:07:49+5:302019-03-05T01:07:56+5:30
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता.
पुणे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता. या सर्वेक्षणातून सुटलेल्या नागरिकांचे पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना स्वच्छतागृहे बांधून देऊन त्यांचा समावेश पायाभूत सर्वेक्षणात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या नुसार जिल्ह्यात जवळपास ११ हजार ८८७ कुटुंबांची नोंद करण्यात आली असून, या पैकी ८ हजार २३८ कुटुंबांना स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत उर्वरित कुटुंबाचेही स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, जिल्हा खऱ्या अर्थाने हगणदरीमुक्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील शौचालय बांधकामात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे.
राज्य शासनाकडून पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील कुटुंबांचे शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची मुदत २८ फेब्रुवारी देण्यात आली होती. राज्य शासनाकडून यामध्ये १५ दिवसांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित ३ हजार ६४९ कुटुंबांचे स्वच्छतागृह बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वाढविण्यात आले. ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत येत्या १५ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी उर्वरित तीन हजार ६४९ स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांना दिले आहे. २०१७ मध्ये जिल्हा हगणदरीमुक्त जाहीर करण्यात आला होता. मात्र, पायाभूत सर्वेक्षणात काही कुटुंबे राहिली होती. त्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे. स्वच्छतागृह बांधून त्याचे छायाचित्र अपलोड केलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्रोत्साहन स्वरूपात १२ हजार रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच वितरित केले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या राहिलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामानंतर तो दर्जा निश्चित होण्यास मदत मिळणार आहे.
या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वापर याबाबत गावपातळीवर ग्रामसेवकाबरोबर नव्याने नेमणूक केलेल्या स्वच्छतागृहांची मदत या कामासाठी होत आहे. या साठी जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून या द्वारे या कामाचे नियंत्रण केले जात आहे.
स्वच्छतागृहे नसणाऱ्या नागरिकांना ते बांधण्यासाठी गट विकास अधिकारी, जिल्हा संपर्क अधिकारी हे गाव भेटीदरम्यान प्रोत्साहित करत होते. यामुळे या कामाला गती मिळत आहे. विस्तार अधिकारी पंचायत यांच्यामार्फत गटनिहाय कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामकाज केले जात आहे. या सर्व यंत्रणांनी येत्या १५ दिवसांत उर्वरित स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
पायाभूत सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्याची संधी राज्य शासनाकडून मिळाल्याने जिल्ह्यातील ११ हजार ८८७ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यातील राहिलेल्या ३ हजार ६४९ कुटुंबांच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.
- सूरज मांढरे,
मुख्य कार्यकारी अधिकारी ं