पाटसच्या मंडलाधिकारी, तलाठ्यावर हलगर्जीपणाचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:11+5:302021-07-05T04:08:11+5:30
पाटस : येथील तत्कालीन मंडल अधिकारी राजेंद्र मस्के, तलाठी शंकर दिवेकर यांनी शासकीय कामात हलगर्जीपणा करून शासनाचे प्रतिमा ...
पाटस : येथील तत्कालीन मंडल अधिकारी राजेंद्र मस्के, तलाठी शंकर दिवेकर यांनी शासकीय कामात हलगर्जीपणा करून शासनाचे प्रतिमा जनमानसात मलीन केला असल्याचा ठपका दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी ठेवला असून तसा अहवाल जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे सादर केला आहे.
येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल ढमाले यांनी तलाठी शंकर दिवेकर यांच्या विरोधात गट क्रमांक ३८७/ अ / १ मधील १७ वर्षांपासून इतर हक्कात असलेली नोंद सातबाराच्या कब्जेदारसदरी करताना तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचा आदेश नसताना बोगस नोंद केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. दरम्यान अनेक बाबींमध्ये त्रुटी असल्याचे शासन पातळीवर निदर्शनास आले आहे. तसेच शेतकरी प्रशांत ठोंबरे यांनी तत्कालीन मंडलाधिकारी राजेंद्र मस्के यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी शेतीचा आदेश जैसे थे ठेवला असताना मंडळ अधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करत मनमानी कारभार केल्याबद्दल त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.
तलाठी व मंडलअधिकारी यांच्या या कामकाजाबाबत वरिष्ठ पातळीवर तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्याने तहसीलदारांनी तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देत कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. तलाठी आणि मंडलाधिकारी यांचा पुढील कारवाईसाठी अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला गेला आहे. दरम्यान, पाटस येथील तलाठी कार्यालयाच्या कामकाजाची सखोल चौकशी केली तर पाटस परिसरात काही जमिनीच्या बोगस नोंदी झाल्या असल्याची प्रकरणे पुढे येतील असे या प्रकरणातील तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्ता राहुल ढमाले यांनी सांगितले.