जि. प. आरोग्यसेवेची पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 02:15 AM2016-04-25T02:15:41+5:302016-04-25T02:15:41+5:30
जनतेला आरोग्य सेवा पुरवत असताना ती गुणवत्तापुर्वक देणे गरजेचे असते. आरोग्य सेवा देत असताना राष्ट्रीय पातळीवर काही नियम व मापदंड ठरलेले आहेत.
वासुंदे : जनतेला आरोग्य सेवा पुरवत असताना ती गुणवत्तापुर्वक देणे गरजेचे असते. आरोग्य सेवा देत असताना राष्ट्रीय पातळीवर काही नियम व मापदंड ठरलेले आहेत. त्या मापदंडाला अनुसरुन ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा दिल्या जातात की नाही याची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील पथकाने शनिवार (दि. २३) दौंड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ व उपकेंद्र वासुंदे या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
या पथकामध्ये नॅशनल अॅक्रिडियेशन बोर्ड फॉर हॉस्पीटल्स अॅन्ड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स (एन. ए. बी. एच.) या शासकीय संस्थेचे मुख्य निरीक्षक डॉ. जे. एल. मीना, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कक्ष अधिकारी डॉ. सना सय्यद, मुळशी तालुका कृषी अधिकारी डॉ. अजित कारंजकर, दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे सहभागी झाले होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी एस. एम. घोंगडे, एम. बी. जमदाडे, ए. पी. राहिंज व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. मीना यांनी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व वासुंदे येथील आरोग्य उपकेंद्राची पाहणी करुन सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. त्याचबरोबर येथील सोयी व सुविधांची माहिती घेऊन आरोग्य सेवा ही राष्ट्रीय पातळीवरील मापदंडाला अनुसरुन दिली जाते की नाही याची पाहणी केली. व काही सुचना केल्या.
येथील आरोग्य सेवेचे कामकाज पाहिल्यांनतर त्यांनी समाधान व्यक्त करुन ही दोन्ही आरोग्य केंद्रे ही निश्चितपणे राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य सेवेची नामांकने प्राप्त करतील असा विश्वास व्यक्त केला.