जि. प. शाळेच्या दुरुस्ती कामाला सुरुवात
By admin | Published: April 25, 2016 02:17 AM2016-04-25T02:17:22+5:302016-04-25T02:17:22+5:30
खोर (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुन्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
खोर : खोर (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुन्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. फुटलेली कौले, जीर्ण झालेल्या भिंती, तुटलेली लाकडे यामुळे विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. मात्र ही स्थिती आता वेळीच आवरली गेली असून, या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.
या इमारतीच्या दुरुस्तीच्या संदर्भात खोरचे सरपंच रामचंद्र चौधरी यांनी जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार शेळके यांनी जिल्हा परिषद निधीतून ३ लाख रुपये निधी दुरुस्तीसाठी मंजूर करवून घेतला असून, सध्या या इमारतीच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. हा निधी ३ लाख रुपये असल्याने दोनच खोल्यांच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. दुरुस्तीच्या आणखी खोल्या बाकी असल्याने आणखी भरीव निधी मंजूर करण्याची मागणी सरपंच रामचंद्र चौधरी, शिक्षक, ग्रामस्थ यांनी शेळके यांच्याकडे केली आहे.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेली ही इमारत ६0 वर्षांची झालेली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत फुटलेल्या कौलातून पावसाचे पाणी वर्ग खोल्यामध्ये येत होते. लहान मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याचे प्रसंग ओढवले गेले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे विद्यार्थांनी, शिक्षक व पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
याबाबत माहिती देताना शेळके म्हणाल्या, की गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे बजेट कमी असल्याने ३ लाख निधी देण्यात आला होता, त्यामुळे राहिलेल्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. मात्र मी पुन्हा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून वाढीव बजेटमधून यावर्षी मागणी केलेली असून, लवकरच निधीची उपलब्धता होणार आहे. त्यानुसार पुन्हा उर्वरित वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधी जिल्हा परिषदेमधून देण्यात येणार आहे.