ख्रिसमससाठी जिल्हा सज्ज
By admin | Published: December 25, 2014 04:57 AM2014-12-25T04:57:07+5:302014-12-25T04:57:07+5:30
ख्रिसमस’हा ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. मात्र, अलीकडे सर्व समाजातील नागरिकही आनंदाने या सणात सहभागी नोंदवितात
बारामती : ‘ख्रिसमस’हा ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. मात्र, अलीकडे सर्व समाजातील नागरिकही आनंदाने या सणात सहभागी नोंदवितात. बारामतीतसुद्धा या सणाची तयारी पूर्ण झाली आहे.
विविध प्रकारच्या रोषणाई, ख्रिसमस ट्री यांची सजावट करण्यात येत आहे. बारामतीमधील चर्चसुद्धा विद्युत रोषणाई आणि विविध आकर्षक देखाव्यांनी सजविण्यात आलेले आहेत.
बारामतीत ख्रिसमसची तयारी पूर्ण झालेली आहे. डिसेंबर सुरू झाली की खरे तर सगळ्यांना वेध लागतात ख्रिसमसचे आणि नववर्षाचे. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बारामती येथील चर्च आॅफ ख्राईस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात विशेष उपासना सभा, कॅरल पार्टी, टॅब्लो, नववर्ष प्रारंभ विशेष उपासना यांचा समावेश आहे. बारामतीतील विविध उपासना मंदिर, मिशन बाईज होम, ख्रिश्चन कॉलनी येथे या कार्र्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले असल्याचे चर्च आॅफ ख्राईस्टचे सचिव सुशील राज राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बारामतीतील बाजारपेठाही विविध सजावटीच्या वस्तू, केक्स, पेस्ट्रीज यांबरोबर वेगवेगळ्या आकारातील ख्रिसमस ट्रीने भरलेल्या आहेत. या ख्रिसमससोबतच नववर्षाच्या स्वागताच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. (वार्ताहर)