जिल्ह्याला मिळाले लसींचे ५५ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:07+5:302021-05-05T04:19:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. मात्र, लसींच्या तुडवड्याअभावी ही मोहीम रखडली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. मात्र, लसींच्या तुडवड्याअभावी ही मोहीम रखडली होती. यामुळे अनेक केंद्रे बंद पडले होते. तर लसीकरण सुरू असलेल्या काही केंद्रांवरून लस कमी असल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले होते. मात्र, मंगळवारी जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सीनचे ५५ हजार नवीन लसीचे डोस देण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून हे डोस सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू होणार आहे. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांनाही ही लस मिळणार आहे. ग्रामीण, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डातील लसीकरणासाठी ही लस वितरित केली जाणार आहे.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून लसीच्या डोसची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आराेग्य विभागावर आली होती. दोन दिवसांत जिल्ह्याला जर लसीचे डोस मिळाले नसते तर अनेक केंद्रे बंद करण्याची वेळ आली असती. यामुळे लसीचे जास्तीत जास्त डोस मिळावे याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. अखेर मंगळवारी कोविशिल्ड लसीचे ४० हजार आणि कोव्हक्सीन लसीचे १५ हजार लसीचे डोस जिल्ह्याला मिळाले. या डोसमुळे काही प्रमाणात लसींचा तुटवडा भरून निघणार आहे. या सोबतच बंद झालेले केंद्रे पुन्हा सुरू होऊन रखडलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा गती मिळणार आहे.
राज्यात १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात सुरुवात झाली आहे. पुण्यातही याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १४ केंद्रांवर याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, लसीचा तुटवडा आणि मर्यादित केंद्र यामुळे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने लस दिली जात आहे. सध्या कोव्हक्सीनचे १५ हजार डोस आल्यामुळे लसीकरणाला गती मिळण्यास मदत होईल.
चौकट
कोव्हक्सीनचे सर्व तालुक्यांना प्रत्येकी १ हजार डोस वितरित करण्यात आले. त्यामध्ये औंध जिल्हा रुग्णालयाला २ हजार लसीचे डोस आले आहेत.
चौकट
तालुकानिहाय कोव्हिशिल्ड लसीचे डोस वितरित करण्यात आले .
आंबेगाव - २८००, बारामती - ३५००, भोर - २०००, दौंड - २५००, हवेली - ४०००, इंदापूर - ३५०० जुन्नर - ३५००, खेड - ३५००, मावळ - ३०००, मुळशी - ३०००, पुरंदर - ३०००, शिरूर - ३५००, वेल्हा - ५००, पुणे कॅन्टोन्मेंट - ५००, देहू कॅन्टोन्मेंट - ५००, खडकी कॅन्टोन्मेंट - ७००