लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:38+5:302021-01-03T04:12:38+5:30
पुणे : कोविड लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज आहेत. जिल्ह्यात लवकरच प्रभावीपणे ही मोहीम राबविणार आहे. त्यासाठी आवश्यक ...
पुणे : कोविड लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज आहेत. जिल्ह्यात लवकरच प्रभावीपणे ही मोहीम राबविणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरेसे असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाची रंगीत तालीम सुरू असलेल्या ठिकाणी देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, लसीकरण प्रभारी डॉ. सचिन एडके उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, लसीकरणाची रंगीत तालीम घेताना कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. प्रत्यक्ष लसीकरणाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यानुसार आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याबाबतची माहिती घेण्यात आली. लसीकरणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. आरोग्य विभागाने चांगले नियोजन केलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लसीकरणादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. पाटील यांनी लसीकरण केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची या वेळी माहिती दिली.