IAS पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण स्थगित; मसुरीतून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:46 PM2024-07-16T17:46:52+5:302024-07-16T17:48:02+5:30
पुढील कार्यवाहीसाठी कुठल्याही परिस्थितीत मसुरी येथे रिपोर्ट करा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत
पुणे: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जिल्हा प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारला लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरीतून सूचना करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी कुठल्याही परिस्थितीत मसुरी येथे रिपोर्ट करा असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार खेडकर यांचे काम स्थगित करून त्यांना मसुरीला पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण सुरूवातीला ३ जून २०२४ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झालं होतं. प्रोबेशन काळात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच या मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवत गाडी पाहिजे, शिपाई पाहिजे, घर पाहिजे म्हणत मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारीच मलाही ऑफिस पाहिजे अशी मागणी केली. खाजगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला. एकच नाही तर या गाडीला लाल आणि निळा दिवाही लावून घेतला. यानंतर त्यांची बदली वाशीमला करण्यात आली.
खेडकर मॅडमचे याच काळात अनेक कारनामे समोर येऊ लागले. त्यांच्या आईने पोलिसांना, मुळशीत शेतकऱ्यांना दमदाटी करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. तर वडील आयएएस अधिकारी असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब पुढे आली. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी ११ वेळा परीक्षा दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, परीक्षेच्या नियमानुसार यूपीएससी परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ६ प्रयत्न असतात; तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा ९ आहे. मग पूजा खेडकर या तब्बल ११ वेळा परीक्षा देऊ शकतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. तर दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवली होती. ते प्रमाणपत्र बनावट असल्याने चौकशीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून त्या संदर्भातील अहवाल मागवला आहे. अहवालानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील, असे बोलले जात आहे. अशातच त्यांना प्रशिक्षण थांबवून मसुरीला पुन्हा बोलावले आहे.