जिल्हा तापला!

By admin | Published: March 30, 2017 12:28 AM2017-03-30T00:28:32+5:302017-03-30T00:28:32+5:30

यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत.

The district was heated! | जिल्हा तापला!

जिल्हा तापला!

Next

पुणे/बारामती : यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाने जिवाची काहिली होत असून सूर्याने चाळिशीच्या आसपास मजल मारल्याचे दिसून येत आहे.
उन्हामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. दुपारी बाजारपेठेतदेखील तुरळक ग्राहक दिसून येत आहेत. या वाढत्या तापमानामुळे दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्यतज्ज्ञांनी दिल्या आहेत.
शहर, तालुक्यात उष्णतेची लाट भडकली आहे. त्यामुळे दिवसा अघोषित संचारबंदी केल्याप्रमाणे रस्ते ओस पडत आहेत. माळेगाव येथील कृषिविज्ञान केंद्राच्या महितीनुसार शहर परिसरात बुधवारी (दि. २९) ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांनी लहान मुलांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, लहान मुलांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. सकाळ, दुपारी, संध्याकाळी लहान मुलांना पाणी पाजणे महत्त्वाचे आहे. नवजात बालकांना दूध पाजणाऱ्या मातांनीदेखील पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. थंड पदार्थ लहान मुलांना देऊ नयेत.
भवानीनगर येथील डॉ. संग्राम देवकाते यांनी सांगितले, की सध्या उन्हामुळे ‘डीहायड्रेशन’चा त्रास होणारे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यातच या भागात कांजिण्यांच्या रुग्णाची संख्या मोठी आहे. या रुग्यांना वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी बाहेरील थंड पेय घेण्यापेक्षा घरगुती लिंबू सरबत, पाणी भरपूर प्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ कटाक्षाने टाळावेत, असे डॉ. देवकाते यांनी सांगितले.

सोशल मीडियावरही चाळिशी

सध्या सोशल मीडियावर ‘चाळिशी’ची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये चाळिशीचा खूप त्रास होत आहे. काय करावे ते कळत नाहीये. तिशीत होतो तेव्हा कसं बरं होतं, उत्साह होता. पण आता नको नकोसे झालं आहे. ४५ च्या आसपास काय होणार काय माहिती, नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत. तापमानाबद्दल बोलत आहे. ही पोस्ट सर्वत्र ‘व्हायरल’ होताना दिसते.

सनबर्नचा धोका
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. राहुल संत यांनी सांगितले, की सध्या तीव्र उन्हामुळे ‘सनबर्न’चा त्रास झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सकाळी १०.३० ते ३.३० या वेळेत सूर्याची अतितीव्र किरणे त्वचेसाठी घातक असतात. त्यामुळे शक्य असल्यास या काळात उन्हात जाणे टाळावे.

सासवड-पुरंदरला कमाल तापमान ४१ अंशांवर
सासवड : सासवडसह पुरंदरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (दि. २९) दुपारी अडीच वाजता कमाल तापमान ४१.३ अंशांवर गेले. गतवर्षी २४ मार्च रोजी तापमान ४०.२ सेल्सिअस होते. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी १ अंशाने वाढ झाल्याची माहिती आचार्य अत्रे वेधशाळेचे व्यवस्थापक नीती यादव यांनी दिली.
गेले दोन-तीन दिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे. सासवडमध्ये बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट जाणवत होता. घराबाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री यांचा वापर केला जात आहे. उसाचा रस, कुल्फी, आईस्क्रीम, थंड पेये घेण्याकडे कल दिसत आहे. थंड पाण्यासाठी बाजारात रांजण, माठ उपलब्ध झाले आहेत. त्यांची किंमत २५० ते १००० रुपयांपर्यंत आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना बाहेर जाणे शक्य नसले तरी मुलांच्या परीक्षा, लग्नसमारंभ, गावोगावच्या यात्रा यासाठी बाहेर पडावे लागतच आहे.

Web Title: The district was heated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.