जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपले

By admin | Published: June 6, 2016 12:41 AM2016-06-06T00:41:31+5:302016-06-06T00:41:31+5:30

पुणे जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाचे आगमन झाले. विशेषत: शिरूर, हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याला शनिवारी तुफानी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडली

The district was overwhelmed by the trenching rain | जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपले

जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपले

Next

पुणे जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाचे आगमन झाले. विशेषत: शिरूर, हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याला शनिवारी तुफानी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडली, घराची छपरे उडून गेली. शेतकऱ्यांनी काढलेला कांदा शेतातच राहिल्याने अनेकांचा कांदा भिजला. मात्र याही परिस्थितीत कांदा भिजला तरी चालेल पण पाऊस पडू दे, अशी प्रार्थना शेतकऱ्यांनी केली. या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष आनंदाने वातावरण होते. या पावसामुळे पेरणीच्या कामांना चांगली मदत होणार आहे.

दौंडला वादळी वाऱ्याचे थैमान
दौंड : शहरात रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह तुफानी वादळी पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळामुळे व्यापार पेठेतील नागरिक सैरावैरा पळत होते. वाऱ्याचा वेग तुफानी असल्याने एकमेकाला माणूस दिसत नव्हता. सुमारे १० मिनिटे वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. यामुळे काही ठिकाणी पत्रे उडाले, तर काही वृक्ष उन्मळून पडले. वादळी वाऱ्यानंतर विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता, तर रेल्वे कुरकुंभ मोरीत पाणी साठल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे अर्ध्या तासाच्या जवळपास पावसाचा जोर मोठा होता. त्यांनतर हळूहळू पाऊस ओसरत गेला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

बारामती शहर, तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
बारामती : बारामती शहर व परिसरात शनिवारी (दि. ४) रात्री विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी साठलेल्या अवस्थेत होते.
सलग दुसऱ्या दिवशी बारामती शहरात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते. रात्री ९नंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बारामतीकरांनी अनुभवला. पावसामुळे शहरात काही काळ कसबा येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात इंदापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले होते.
पावसाची आकडेवारी : बारामती शहर ५५ मिमी, लाटे ५२ मिमी, सुपे ३९ मिमी, लोणी भापकर २९ मिमी, बऱ्हाणपूर ४२ मिमी, सोमेश्वर कारखाना २८ मिमी, पणदरे ५५ मिमी, जळगाव क. प. ३२ मिमी, मानाजीनगर ४५ मिमी, वडगाव निंबाळकर ५५ मिमी, मोरगाव ३१ मिमी, ८ फाटा होळ ५० मिमी, उंडवडी क. प. ८ मिमी, माळेगाव ६० मिमी, चांदगुडेवाडी ३१ मिमी, काटेवाडी ५० मिमी. (प्रतिनिधी)

बारा तास वीजपुरवठा खंडित
दौंड शहरात रात्री पावसाला सुरुवात झाली. जुन्या गावठाणात रात्री १० च्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तर वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वाजता पूर्ववत झाला. तसेच शहराच्या रेल्वे कुरकुंभ मोरीपलीकडील भागात शनिवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
आठवडेबाजाराला पहिल्याच पावसात नदीचे स्वरूप
दौंड नगर परिषदेच्या वतीने गाववेशीजवळ आठवडेबाजार बांधण्यात आला
आहे. परंतु काही भागातील बांधकाम ठेकेदाराने व्यवस्थित न केल्याने आठवडेबाजारातील काही भागात पाणी साचल्याने पहिल्याच पावसात बाजाराला नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे व्यापारी, शेतकरी व ग्राहकांची मोठी कुचंबणा झाली. परिणामी आठवडेबाजाराचे अद्याप उद्घाटन झालेच नाही. काही कामे अपूर्ण स्वरूपात असतील मात्र आठवडेबाजाराचे अपूर्ण स्वरुपाची कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारही पुढे येईना. आठवडेबाजारातील अंतर्गत भागात साचलेले पाणी बाहेर निघण्यासाठी व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साठून राहिले. तसेच दौंडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेच्या वेळेस आठवडेबाजाराच्या एका भिंतीची अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, धार्मिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भिंत पाडण्यात आली; परंतु पडलेली भिंत अद्याप बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवडेबाजाराचे कामकाज निकृष्ट झाल्याने नाराजीचा सूर आहे.

दोन दिवसांत
९६ मिमी पाऊस
सणसर (ता. इंदापूर) येथे शनिवारी रात्री दोन तासांत ६७ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस अतिवृष्टी मानला जातो. सलग दुसऱ्या दिवशी या भागात दमदार पाऊस झाला.
दोन दिवसांत येथे ९६ मिमी पाऊस झाला आहे. अतिवृष्टी होऊनही कोणत्याही प्रकारचे नुकसान येथे झाले नाही. त्यामुळे शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला.

पारवडीत पहिलाच मुसळधार पाऊस
पारवडी : पावसाची आतुरतेने
वाट पाहत असलेला बळीराजा अखेर पहिल्याच मुसळधार
पावसाने सुखावला. पारवडीसह शिर्सुफळ, कटफळ आदी
गावांसह परिसरात रात्री उशिरा पाऊस झाला.पावसाच्या पाण्याने शेतात, नाल्यात तसेच तळ्यात पाणी साठलेले आहे. कालपासून वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे वन विभागाचे सर्व तलावात वन्य प्राण्यांचा गरजेपुरता पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुढील दोन महिन्यांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

Web Title: The district was overwhelmed by the trenching rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.