जिल्ह्यात पुन्हा राजकीय फड रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:55 AM2018-04-24T02:55:43+5:302018-04-24T02:55:43+5:30
थेट जनतेतून सरंपच निवडीसाठी ही तिसरी निवडणूक होत असून यामुळे मोठी चुरस होणार आहे.
पुणे : जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा तिसरा टप्पा जाहीर झाला असून उन्हाळी सुट्टीच्या काळात पुन्हा एकदा गावागावांत राजकीय फड रंगणार आहे. निवडणुकींचे बिगुल वाजले असून सुमारे ९० ग्रामपंचायती व २५८ ग्रामपंचायतींमधील ४५६ रिक्त पदांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आचारंहिता लागू झाली आहे. थेट जनतेतून सरंपच निवडीसाठी ही तिसरी निवडणूक होत असून यामुळे मोठी चुरस होणार आहे. काही प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लागल्याने अनेक मात्तबरांचे भवितव्य पणाला लागणार आहे.
नुकत्याच २७ मार्च रोजी दुसºया टप्प्यातील २६ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक व ३८ गावांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, पुणे शहरालगतच्या काही मोठ्या ग्रामपंचायतीत शिरकाव करण्यात भाजपाला यश आले होते. त्यामुळे यावेळी मोठा राजकीय आखाडा रंगला होता. त्यानंतर महिनाभरातच आता तिसºया टप्प्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आगामी विधानसभा व लोकसभेची चाहूलही लागली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय ताकद दाखविण्यासाठी राजकीय पक्ष लक्ष केंद्रीत करणार आहेत.
राज्यातील ६५४ ग्रामपंचयातीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहिर झाला. पुणे जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतीत निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. आलेल्या
अर्जांची छाननी १४ मे रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे १६ मे पर्यंत मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान २७ मे रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत होईल. २८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायती
भोर : भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा व ७१ ग्रामपंचायतींचा पोट निवडणुक होत आहे. माहे जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासह सर्व सदस्य तसेच रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जहिर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुक लागलेली गावे व सरपंच आरक्षण व निवडणुक कार्यक्रम खालील प्रमाणे ग्रामपंचायत रायरी सरपंच आरक्षण (सर्वसाधारण स्त्री), वारवंड (सर्वसाधारण), शिळींब (सर्वसाधारण), अशिंपी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), नाटंबी (सर्वसाधारण स्त्री), करंजे (अनुसूचित जामाती स्त्री). भटक्या विमुक्त रिक्त १०९ प्रभागातील अनेक गावातील एक पासुन ५ सदस्यांपर्यत रिक्त असलेल्या १२६ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. सर्वाधीक रिक्त ७ जागा वाढाणे ग्रामपंचायतीच्या आहेत.
इंदापूर तालुक्यात ५ ग्रामपंचायती
इंदापूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बावडा, वकीलवस्ती, काझड, शिंदेवस्ती, लाकडी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. वरकुटे खुर्द, गिरवी, भिगवण, पिठेवाडी, थोरातवाडी रुई ग्रुप ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत.