हगणदरीमुक्त अभियानात जिल्ह्याची आघाडी
By admin | Published: October 10, 2015 05:09 AM2015-10-10T05:09:08+5:302015-10-10T05:09:08+5:30
जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती गावे हगणदरीमुक्त झाली आहेत. तसेच, मुळशी तालुका हगणदरीमुक्त झाल्याने आज राज्याचे
पुणे : जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती गावे हगणदरीमुक्त झाली आहेत. तसेच, मुळशी तालुका हगणदरीमुक्त झाल्याने आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय आत्मसन्मान कार्यशाळा पुण्यात बालेवाडी येथे आयोजित केली आहे. या वेळी राज्यात १00 टक्के हगणदरीमुक्त झालेल्या ७ तालुक्यांचा गौरव करण्यात आला.
मुळशीचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र कंधारे, गटविकास अधिकारी शालिनी कडू पाटील यांनी स्वीकारला. तालुका हगणदरीमुक्त झाल्याशिवाय कोणताही सत्कार स्वीकारायचा नाही असा निर्धार कंधारे यांनी केला होता. २ आॅक्टोबर रोजी तालुका हगणदरीमुक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर आज राज्य सरकारतर्फे सत्कार स्वीकारत तालुका हगणदरीमुक्त झाल्याचा मला विशेष आनंद होत असल्याचे कंधारे यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. पुणे जिल्हाही यात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी प्रशासनाला मुळशी तालुका हगणदरीमुक्त करण्यात यश आले आहे. यंदा भोर व वेल्हे तालुक्यात १00 टक्के शौचालये बांधण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. हगणदरीमुक्त ग्रामपंचायतींत मुळशी तालुक्याने ९५ पैकी ९५ ग्रामपंचायतींत (१00 टक्के) शौचालये बांधून पहिला क्रमांक मिळवला आहे. (प्रतिनिधी)