खेड तालुक्यातील खळबळजनक घटना; स्फोट घडवून फोडले एटीएम मशीन, पळवले तब्बल १६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 09:04 PM2021-12-26T21:04:15+5:302021-12-26T21:04:30+5:30

जिलेटीनसदृष्य लिक्विडचा वापर करत चोरट्यांनी एटीएम केंद्रात स्फोट घडवून एटीएम मशिन फोडले. मशिनमधील १६ लाख ५१ हजाराची रोकड घेऊन चोरटे पसार झाले

disturbing incidents in Khed taluka ATM machine blown up Rs 16 lakh looted | खेड तालुक्यातील खळबळजनक घटना; स्फोट घडवून फोडले एटीएम मशीन, पळवले तब्बल १६ लाख

खेड तालुक्यातील खळबळजनक घटना; स्फोट घडवून फोडले एटीएम मशीन, पळवले तब्बल १६ लाख

Next

पिंपरी : जिलेटीनसदृष्य लिक्विडचा वापर करत चोरट्यांनी एटीएम केंद्रात स्फोट घडवून एटीएम मशिन फोडले. मशिनमधील १६ लाख ५१ हजाराची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. खेड तालुक्यातील चिंबळी येथे रविवारी (दि. २६) पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंबळी येथे अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएम केंद्रात रविवारी पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी जिलेटीनसदृष्य लिक्विडचा वापर करत स्फोट केला. या स्फोटात एटीएम मशिन पूर्णपणे फुटले. एटीएम मशिनमध्ये असलेली १६ लाख ५१ हजार ४०० रूपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा तसेच श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली. 

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दुसरी घटना

जुलै २०२१ मध्ये चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी स्फोट करून फोडले होते. हा स्फोट नक्की कशाच्या सहाय्याने केला होता, याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी स्फोटाचे नमुने फॉरेन्सीक लॅबकडे पाठविले होते. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यानंतर चिंबळी येथे पुन्हा त्याच पद्धतीने चोरट्यांनी स्फोट करून चोरट्यांनी एटीएम फोडले. स्फोट करून एटीएम फोडण्याची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील यंदा घडलेली ही दुसरी घटना आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर फवारला काळा ‘स्प्रे’

एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर एका चोरट्याने काळा स्प्रे फवारला. यात दोन ते तीन चोरट्यांचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. स्फोट कशाच्या साह्याने केला हे फॉरेन्सीक लॅबकडून अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती चाकण विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली.      

''बँकेच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षकाची नेमणूक केलेली नव्हती. याबाबत बॅंकेला नोटीस पाठविण्यात आली होती. चोरट्यांनी कशाच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला, याचा शोध घेण्यात येत आहे असे आळंदीचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले.''

Web Title: disturbing incidents in Khed taluka ATM machine blown up Rs 16 lakh looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.