‘डायव्हर्शन’ बनले मृत्यूचा सापळा, पुणे-सोलापूर महामार्गावर भादलवाडी बनले अपघाताचे केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:04 AM2019-03-17T01:04:39+5:302019-03-17T01:04:57+5:30
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे.
पवळसदेव - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे. भादलवाडी येथेही डाळज बाजूकडून येणाऱ्या वाहनांना डायव्हर्शन दिले आहे. मात्र भरधाव वेग अन् चुकीचा रस्ता यामुळे अपघात होऊन एक जण ठार व एक जण जखमी झाला आहे.
रात्री आठ वाजता हा अपघात झाला. मोहम्मद अलीम नबी हसन शहा (वय ३५, सध्या रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. बहारण सय्यद अन्सारी (वय ४५, रा. सदर) जखमी झाले आहेत. भिगवण बाजूकडून हे दोघे इंदापूर बाजूकडे जात होते. बुधवारी रात्री भादलवाडी येथे डायव्हर्शनच्या ठिकाणी अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल डायव्हर्शनला धडकली.
यामध्ये एक ठार, तर एक जण जखमी झाला आहे. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती, की मृत्यू झालेल्याचा मेंदू बाहेर पडला होता. त्यामुळे महामार्गावरील ठिगळे बुजविणयाचे काम कधी संपणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक लोकांना याची कल्पना असते. मात्र इतर वाहनचालकांना याची कल्पना नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावत असतात. परिणामी अपघात होऊन जीव जातो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी याकामी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा अपघातांची मालिका अशीच सुरू राहील.
नारायणगावात साइडपट्टीसाठी मोठे दगड; वाहनांचे अपघात
नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्ग क्र. ६० वरील नारायणगाव शहरात सुरू असलेल्या रस्तारुंदीकरणात ठेकेदाराने साइडपट्टीसाठी मोठे दगड टाकून ठेवल्याने अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. या साइडपट्ट्यांचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे; अन्यथा होणाऱ्या अपघातांना जबाबदार धरून संबंधित ठेकेदार व सबठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव (अण्णा) खैरे यांनी दिला आहे.
बाह्यवळणाचे काम रेंगाळल्याने खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खास बाब म्हणून नारायणगाव येथील ५ कि.मी.रस्त्यासाठी २२ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला होता. या कामाचे टेंडर १७ कोटी रुपयांस दिलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना नारायणगाव ग्रामस्थ व व्यापारी यांनी आंदोलन केले होते. त्या वेळी ठेकेदार संतोष घोलप यांनी रस्त्याचे काम दर्जात्मक करण्याची ग्वाही देऊन हे काम त्वरित पूर्ण करू, असे जाहीर केले होते; तसेच रस्त्याच्या साइडपट्ट्याची ४५० एमएम खोदाई व त्यामध्ये २०० जीएसबी मटेरियल टाकण्यात येईल. त्यानंतर २५० डब्यु एमएम इतका वरचा मिक्स मटेरियलचा थर राहील. तसेच ५० एमएमचे डांबरीकरण व नंतर बी.सी.मटेरियल राहील. सध्या मूळचा रस्ता ३.५ मीटरचा व १.५ मीटर साइडपट्टी असा आहे. नव्याने ५ मीटरचे डांबरीकरण त्यामध्ये ३ मीटर ते ६ मीटर व्हेरिश्न व २ मीटरचे डेज्नेज तसेच ज्याठिकाणी वाढीव रस्ता आहे त्याठिकाणी रस्तारुंदीकरण करण्यात येईल. खराब पट्टी काढून नव्याने टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. यानंतर आंदोलकांनी संयम ठेवल्यानंतर ठेकेदाराकडून संथगतीने काम सुरू आहे. नारायणगाव बसस्थानक ते शिवाजीराव खैरे कॉर्नरपर्यंत साइडपट्टीकरिता मोठ मोठी खडी टाकलेली आहे. या खडीमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात होऊन वाहन चालक जखमी झालेले आहेत. दररोजच वाहने घसरून अपघात होत असल्याने या बाबतची माहिती ठेकेदारास दिल्यानंतरही साइडपट्टीचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे व्यापारीवर्ग त्रस्त झालेला असून वाहनचालकही वारंवार होणाºया अपघातांमुळे संतप्त झाले आहेत. ठेकेदाराने साइडपट्ट्यांचे त्वरित डांबरीकरण करावे; अन्यथा संबंधित ठेकेदारास होणाºया अपघाताला जबाबदार धरून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा खैरे यांनी दिला आहे.