जैवविविधता कमी होणे निसर्गासाठी धोका - विवेक खांडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:20 AM2019-03-22T02:20:45+5:302019-03-22T02:21:02+5:30
आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत.
पुणे - आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत, ही खरंच धोकादायक बाब असून, जर जैवविविधता अबाधित ठेवायची असेल तर सर्र्वांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी व्यक्त केले. जागतिक वन दिनानिमित्त आयोजित जीविधता महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शास्त्रज्ञ पी. लक्ष्मीनरसिंह, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, भूगोल विभागप्रमुख रवींद्र जायभाये, डॉ. सचिन पुणेकर, रोटरीचे रवींद्र देशपांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकारांनी काढलेले फोटोे प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. या वेळी जागतिक जलदिनानिमित्त ‘थेंब’ या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. महोत्सवात गुरुवारी जैविक आक्रमणे व त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच शुक्रवारी कुकडी नदी आणि सिद्धबेट आळंदी या ठिकाणी अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कार्यशाळेसाठी आलेले मार्गदर्शक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अविनाश करंदीकर, तर आभार रवींद्र देशपांडे यांनी मानले.
पुण्यामध्ये हिरवाईचे क्षेत्र कमी होत आहे. मोकळा श्वास केवळ वन विभागाने जपलेल्या क्षेत्रावरच घेता येतो. कारण त्या ठिकाणीच जैवविविधा जपली गेली आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यात विद्यार्थी, नागरिक, संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे. वन विभाग प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी आपली जबाबदारी घ्यावी.
- विवेक खांडेकर
दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत चाललेला ºहास हा चिंताजनकच आहे. विद्यापीठात झालेल्या बांधकामानेदेखील या ठिकाणच्या पर्यावरणावर काही प्रमाणावर परिणाम झालेला आहे. आम्ही मागील वर्षी टेकडीवर ३ हजार पाचशे झाडे लावली होती. परंतु उंदीरमारीसारख्या वनस्पतीमुळे त्यातील दहासुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत.
- डॉ. नितीन करमळकर