चार सदस्यांचाच प्रभाग

By admin | Published: May 28, 2016 04:29 AM2016-05-28T04:29:31+5:302016-05-28T04:29:31+5:30

राज्य सरकारने अखेर महापालिकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठीचा अध्यादेश शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध झाला; मात्र तो १९ मे रोजीचा

Division of four members | चार सदस्यांचाच प्रभाग

चार सदस्यांचाच प्रभाग

Next

पुणे : राज्य सरकारने अखेर महापालिकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यासाठीचा अध्यादेश शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध झाला; मात्र तो १९ मे रोजीचा असून नगरपालिकांसंबंधीचा आहे व महापालिकांचा निर्णय अजून झालेलाच नाही, असे राजकीय तसेच पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातूनही रात्री उशिरापर्यंत सांगण्यात येत होते.
प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील प्रकरण २ मध्ये महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीत प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर चार पालिका सदस्य, परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील, असे स्पष्ट म्हटले आहे. त्याचबरोबर, प्रत्येक मतदाराला त्याच्या प्रभागातील निवडून द्यायच्या पालिका सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा हक्क असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. या अध्यादेशाची पुढील प्रकरणे नगरपालिकांमध्ये अध्यक्ष थेट मतदारांमधून निवडून देण्याच्या बदलासंबंधीची आहेत. हा अध्यादेश अद्याप मिळालेला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंत्रिमंडळाने नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये बदल केला आहे. महापालिका प्रभाग सदस्यसंख्येतील बदलाला मात्र अद्याप मान्यता दिलेली नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातून तरी महापालिकांच्या प्रभागसंख्येतही बदल केला असल्याचे स्पष्ट होते. महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी, संबंधित अध्यादेश प्रशासनाला अद्याप मिळालेला नसल्याचे सांगितले. पूर्ण अध्यादेश पाहिल्यानंतरच काय ते नक्की सांगता येईल, असे ते म्हणाले.
राजकीय वर्तुळातही असा काही निर्णय झाला याबाबत अनभिज्ञता होती. अद्याप निर्णय झालेला नाही, येत्या मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा आहे. त्यानंतरच अध्यादेश जारी होईल, असे सांगण्यात येत होते. दरम्यान असा काही निर्णय राज्य सरकारने घेतलाच, तर त्याविरोधात थेट न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्याशिवाय, राज्य सरकारचा मित्र पक्ष असलेल्या रामदास आठवलेप्रणीत रिपब्लिकन पक्षानेही चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीला विरोध केला आहे.
(प्रतिनिधी)

पुण्यात ३८ प्रभाग होण्याची शक्यता
पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १० महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तीत वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने भाजपा सरकारने हा राजकीय निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने बहुसदस्यीय प्रभाग करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती; मात्र अंतिम निर्णय झालेला नव्हता. आता तसे राजपत्रच प्रसिद्ध झाल्यामुळे पुण्यासह सर्वच पालिकांमध्ये ४ ते ५ सदस्यांचा एक प्रभाग राहणार, हे निश्चित झाले आहे. पुण्यात सध्या दोन सदस्यांचा एक प्रभाग आहे. आता प्रभागरचना नव्याने होऊन साधारण ८० ते ९० हजार मतदारांचा एक प्रभाग व त्यात चार सदस्य, असे साधारण ३८ प्रभाग होण्याची शक्यता आहे.

Web Title: Division of four members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.