विभागीय निकालातही ‘पुणेच’, जिल्ह्याचा निकाल ९२.९९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 05:41 AM2018-06-09T05:41:32+5:302018-06-09T05:41:32+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत मार्च २०१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत मार्च २०१८मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विभागीय निकालानुसार पुणे जिल्ह्याने बाजी मारली असून, त्याचा निकाल ९२.९९ टक्के इतका लागला आहे. यानंतर अनुक्रमे सोलापूर (९२.२७ टक्के) व अहमदनगर (९०.३० टक्के) यांचा क्रमांक आहे.
पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेकरिता २ लाख ६९ हजार २२० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यांपैकी २ लाख ६८ हजार ८८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून २ लाख ४६ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेस नोंदणी झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ७७ होती. त्यांपैकी १५ हजार ९२२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार २८६ असून पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ४६.७६ आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या निकालाची तुलना केल्यास या वर्षीदेखील मुलांंपेक्षा मुलीच वरचढ असल्याचे दिसून येते.
१ लाख ४८ हजार ८७७ विद्यार्थ्यांची परीक्षेकरिता नोंदणी झाली. त्यांपैकी १ लाख ४८ हजार २३७ प्रविष्ट झाले. त्यातील १ लाख ३३ हजार ७१६ जण उत्तीर्ण झाले. विद्यार्थिनींची संख्या पाहिल्यास १ लाख १९ हजार ८५१ जणी परीक्षेकरिता प्रविष्ट झाल्या. यपिंैकी १ लाख १३ हजार १३९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
यंदाच्या उल्लेखनीय बाबी
विभागनिहाय पुनर्परीक्षार्थींच्या निकालात झालेली वाढ.
पुणे, अहमदनगर व सोलापूर यांपैकी सर्वाधिक पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात.
पुणे जिल्ह्यातील ९ हजार ८२७ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
यातून ४ हजार ४१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ४५.३९ आहे.
सोलापूर जिल्ह्यात उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.
३ हजार २९२ पुनर्परीक्षार्थींपैकी १ हजार ७११ उत्तीर्ण झाले.
अहमदनगर जिल्ह्यात हे प्रमाण ३९.७७ टक्के एवढे आहे.
मानस गाडगीळला १०० टक्के
महाराष्टÑ एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर शाळेचा विद्यार्थी मानस गाडगीळ याने दहावीमध्ये १०० टक्के गुण मिळविले. बालशिक्षण मंदिर शाळेचा निकाल गेली २६ वर्षे १०० टक्के लागत आहे. मानसला गणितात ९९, विज्ञानात ९८, सामाजिक शास्त्रांत ९७, संस्कृतमध्ये ९६ व इंग्रजीत ८८ गुण मिळाले. त्याचबरोबर टेबिल टेनिसमध्ये त्याने राष्टÑीय पातळीवरील स्पर्धांत यश मिळविल्याने त्याला २२ गुण मिळाले.