उच्चशिक्षित दांपत्याचा २१ दिवसांत परस्परसंमतीने घटस्फोट मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:13 AM2021-08-20T04:13:30+5:302021-08-20T04:13:30+5:30
पुणे : घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी जोडप्यांना दिला जातो. मात्र, एका उच्चशिक्षित दांपत्याने परस्परसंमतीने दाखल केलेल्या ...
पुणे : घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी जोडप्यांना दिला जातो. मात्र, एका उच्चशिक्षित दांपत्याने परस्परसंमतीने दाखल केलेल्या घटस्फोटाचा दावा अवघ्या २१ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. दोघे सुमारे दीड वर्षांपासून विभक्त राहत आहेत. आता सहा महिने थांबणे शक्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याच्या आधारे वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यानुसार हा कालावधी वगळून प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला.
शिरीष आणि सुमन (बदललेली नावे) या जोडप्यापैकी तो आयटी क्षेत्रात कार्यरत असून, ती डॉक्टर आहे. दोघांचे पारंपरिक पद्धतीने पाहणी करून (अरेंज मॅरेज) लग्न झाले आहे. दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि दोघेही जुलै २०१९ पासून विभक्त राहत आहेत. दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. अनिकेत डांगे आणि ॲड. लक्ष्मण सावंत यांच्यामार्फत दावा दाखल केला. दि. ६ जुलै रोजी दावा रजिस्टर करण्यात आला आणि अवघ्या २१ दिवसांत म्हणजे दि. २६ जुलै रोजी न्यायालयाने मंजूर केला. शिरीष हा बाहेरगावी असतो, तर ती पुण्यात असते. दोघांना तीन वर्षांचा मुलगा असून, तो तिच्याकडेच राहणार आहे.
-------------------------------------------------------
पती-पत्नी दोघांचे पटत नसल्यामुळे दोघेही पुन्हा एकत्र येऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले. परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांचा पुढे जाणारा वेळ वाचला. दोघेही स्वतंत्रपणे जीवन व्यतीत करू शकतात.
- अॅड. प्रणयकुमार लांजिले, अर्जदाराचे वकील.
---------