दिव्यांगांनी चाखला आंब्याचा गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:42 PM2018-04-16T18:42:11+5:302018-04-16T18:42:11+5:30
हापूस आंब्यांची मेजवानी आणि डिजेच्या तालावर थिरकण्याची संधी मिळाल्याने दिव्यांग आणि वंचित-विशेष मुलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
पुणे : चिमुकल्या हातांमध्ये आंबे पकडून ते खाण्याच्या शर्यतीत सहभागी होत दिव्यांग व दृष्टीहिन मुलांनी आंब्याचा गोडवा चाखला. शारिरीक व मानसिक अपंगत्वाने जीवनाशी दोन हात करणा-या चिमुकल्यांनी आंब्यांवर यथेच्छ ताव मारला. चिमुकल्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत आम्हीही तुमच्यामधील एक आहोत, या भावनेने यंदा वाहतूक विभागातील पोलीस काकांनीही आंबे खाणे स्पर्धेत सहभाग घेत चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित केला.
निमित्त होते, निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे दिव्यांग आणि वंचित विशेष मुलांसाठी आयोजित निरंजन मँगो मस्ती या आंबे खाणे स्पर्धेचे. यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, महेश पारेख, शामसुंदर मुंदडा, विमल करनानी, संध्या झंवर, संस्थेचे भरत लढे, अजय झंवर, जगदीश मुंदडा यांसह संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांग मुलांसह ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मुलांनीही स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेनंतर चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे देण्यात आली. पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिसांनी यामध्ये मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
अशोक मोराळे म्हणाले, ‘वाहतूक नियमनासोबतच सामान्य नागरिकांमध्ये जनजागृतीसह सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच सक्रिय आहे. पोलिसांविषयी लहान मुलांमध्ये असलेली भीती दूर व्हावी आणि त्यांनी गरजेच्या वेळी पोलिसांकडे यावे, यासाठी या उपक्रमात वाहतूक शाखेने सहभाग घेतला आहे. रस्त्यावर वाहतूक नियमन पोलीस करीत असल्याचे लहान मुले अनेकदा पाहतात, त्यामुळे पोलिसांविषयी त्यांच्या मनात अनेकदा भीती निर्माण होते. त्यांच्या मनातील ही भीती दूर करुन त्यांच्याशी पोलीस काका हे नाते घट्ट करण्याकरीता आम्ही पुढाकार घेतला आहे.’
हापूस आंब्यांची मेजवानी आणि डिजेच्या तालावर थिरकण्याची संधी मिळाल्याने दिव्यांग आणि वंचित-विशेष मुलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आंबे खाणे स्पर्धेतील आंब्याच्या सुमारे २ हजार ५०० कोयी संस्थेचे कार्यकर्ते पुण्याजवळील ग्रामीण भागात पेरणार असून या माध्यमातून वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावर्षी लोकमंगल फाऊंडेशन, जुन्नर मतिमंद मुलांची शाळा, माहेर संस्था, लुई ब्रेल अंध मुले व मुली, नूतन समर्थ विद्यालय, पिनॅकल रिक्रिएशन या संस्थेतील २५० पेक्षा अधिक विशेष मुलांनी सहभाग घेतला होता. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले.