भोर तालुक्यातील दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:49+5:302021-03-24T04:09:49+5:30
--- भोर : भोर तालुक्यात दिव्यांग व्यक्तींच्या संघटना कार्यरत आहेत शासकीय योजनांचा लाभ मिळवताना त्यांना विविध समस्यांना सामोरे ...
---
भोर : भोर तालुक्यात दिव्यांग व्यक्तींच्या संघटना कार्यरत आहेत शासकीय योजनांचा लाभ मिळवताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. भविष्यात या सर्व संघटनांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल, शासकीय योजनेच्या लाभापासून एकही दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाही, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.
अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, वानवडी व गुरुकुल माऊली विद्यार्थी सेवा ट्रस्ट, भोलावडे आणि अखिल वारकरी संघ, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पंढरीनाथ भिलारे यांच्या पुढाकाराने भोलावडे येथील नीरामाता वाळवंट विठ्ठल रखमाई मंदिराच्या सभागृहात दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी व कृत्रिम अवयवांचे वाटप शिबिर आयोजिले होते. त्याचे उद्घाटन आमदार थोपटे यांचे हस्ते करण्यात झाले. या वेळी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे, मधुकर नानेकर, राजू मांढरे, मच्छिंद्र कुंभार, नामदेवमहाराज किंद्रे, ह. भ. प. राजेंद्रमहाराज शास्त्री, ह. भ. प. दत्तात्रय गिरे, सुनील धुमाळ, प्रवीण शिंदे, धर्मराज हांडे, सतीश वाल्हेकर, श्रीकांत धुमाळ, बाळासो कुंभार, प्रदीप शिनगारे, अनिल सावले, कालिदास आवाळे, दत्तात्रय गावडे, मनीषा गायकवाड आदी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, या मंदिराला वारकरी सांप्रदायाची ८९ वर्षांची परपरा आहे. या वाळवंट मंदिरात खऱ्या अर्थाने संस्कृती जोपासण्याचे काम वारकरी मंडळी करत आहे. भोरमध्ये या हरिभक्तांसाठी वारकरी भवन उभारण्याचा संकल्प असून त्यासाठी नजीकच्या काळातच हे काम पूर्ण केले जाईल.
या वेळी शिबिरात ४६५ दिव्यांगांची आरोग्य तपासणी व कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात उमेश महाराज शिंदे यांनी शिबिराचा उद्देश सांगून तालुक्यात १२८४ दिव्यांग व्यक्ती असल्याची माहिती दिली. सूत्रसंचालन विठ्ठल आवाळे यांनी केले, ह.भ.प.पंढरीनाथ भिलारे यांनी आभार मानले.