पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल साडेअठरा लाख नागरिकांची यंदाची दिवाळी 'थंड'च जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:13 PM2020-10-30T12:13:16+5:302020-10-30T12:32:02+5:30
शिधापत्रिका धारकांना दिवाळीसाठी चणा डाळ, साखर, पामतेल असे जिन्नस दिले जायचे.
विशाल शिर्के -
पुणे/ पिंपरी : अन्न धान्य वितरण योजने अंतर्गत शिधापत्रिका धारकांना दिवाळीसाठी दिली जाणारी चनाडाळ, पामतेल आणि साखर असा कोणताही अतिरिक्त शिधा दिला जाणार नाही. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील साडेअठरा लाख नागरिकांची दिवाळी कोरडी जाणार आहे. तर प्राधान्यक्रम शिक्का असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना जुलै महिन्याचे धान्य येत्या एक नोव्हेंबरपासून दिले जाणार आहे.
शिधापत्रिका धारकांना दिवाळीसाठी चना डाळ, साखर, पामतेल असे जिन्नस दिले जायचे. गेल्या पाच वर्षात एखादा अपवाद वगळता दिवाळीला शिधा मिळालेला नाही. केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य बंद झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी शिधापत्रिका धारकांना ऑगस्ट २०२० पर्यंत माणशी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यांना जुलै महिन्याचे धान्य नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे.
अंत्योदय कार्डधारकांना कार्डमागे एक किलो साखर आणि गहू, तांदूळ दिले जाते. तर ५९ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या प्राधान्यक्रम शिधापत्रिका धारकांना गहू आणि तांदूळ मिळेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब योजनेला नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या मुळे केशरी वगळता इतर शिधापत्रिका धारकांना एक किलो चणा डाळही मिळेल, अशी माहिती अन्न धान्य वितरण कार्यालयायील सूत्रांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता शिधापत्रिका धारकांसाठी सरकार काही गोड घोषणा करेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरल्याचे स्पष्ट होते.
रास्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी म्हणाले, पूर्वी दिवाळीला प्रत्येक कार्डमागे एक किलो पामतेल, रवा, मैदा, चनाडाळ आणि साखर दिली जात होती. गेल्या पाच वर्षात एकदा साखर दिली गेली होती. केशरी शिधापत्रिका धारकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट पर्यंत गहू आणि तांदूळ देण्याचे जाहीर केले होते. दुकानदारांनी त्या प्रमाणे पैसे भरले. मात्र, सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जुलै महिन्याचे धान्य मंजूर झाले आहे. नोव्हेंबरमध्ये ते धान्य वाटप केले जाईल.
----
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शिधापत्रिकाधारक
अंत्योदय शिधापत्रिका संख्या ८,३००
प्राधान्यक्रम शिधापत्रिका संख्या ३,१३,०००
अंत्योदय-प्राधान्यक्रम लाभार्थी संख्या १३.२२ लाख
केशरी शिधापत्रिका संख्या ५.०४ लाख
केशरी लाभार्थी संख्या १५.४१ लाख
......
शिधापत्रिकाधारकांना दिवाळीला चनाडाळ, साखर द्यावी
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला असून, हातावर पोट असलेल्या व्यक्तीना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना दिवाळीसाठी रवा, मैदा, आटा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कन्झ्युमर प्रोटेक्शन कमिटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.