कौशिकीच्या अभंगाने पहाट मैफलीत' स्वरचैतन्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 10:02 AM2018-11-08T10:02:07+5:302018-11-08T10:05:43+5:30
रसिकांना स्वरमंडपाकडे खेचून आणण्याची जबरदस्त ताकद ज्यांच्या कंठ स्वरामध्ये आहे, असे रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती.
पुणे - रसिकांना स्वरमंडपाकडे खेचून आणण्याची जबरदस्त ताकद ज्यांच्या कंठ स्वरामध्ये आहे, असे रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती. त्याच्या रसपूर्ण गायकीतून एक अवीट गोडीचा श्रवणानंद अनुभवास मिळत असल्याने त्याच्या मैफिलीला हमखास 'कानसेनांची' गर्दी होते... गुरुवारी त्याचीच प्रचिती आली. 'याची देही याची डोळा' हा सुरांचा अनोखा साक्षात्कार अनुभवण्यासाठी' दर्दी 'पुणेकरांनी गर्दी केली होती. कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या मधुर गायकीमधून स्वरांची मुक्तपणे उधळण केल्याने रसिकांची दिवाळी पहाट' स्वरचैतन्य' मयी झाली.
पंडित विश्वमोहन भट यांच्या मोहनवीणेच्या काहीशा मंजूळ आणि आर्त सुरावटीने एका वेगळ्याच सांगीतिक 'विश्वा' ची अनुभूती रसिकांना दिली. मोहनवीणे सह पंडित विजय घाटे व पंडित भवानी शंकर यांच्या तबला आणि पखवाज यांच्या जुगलबंदीने प्रसन्न वातावरणात सुरांचे अनोखे रंग भरले.
निमित्त होते, युवराज ढमाले कॉर्पस प्रस्तुत आणि फिनॉलेक्स पाईप्स व पीएनजी यांच्या सहयोगाने आयोजित लोकमत ' स्वरचैतन्य' दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे. पंडित विश्वमोहन भट यांच्या मोहननविणा सादरीकरणाने कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली.
कोकिळचा मंजूळ स्वर आणि देवाला आळवणी करणाऱ्या भजनाच्या मोहनवीनेवर छेडल्या गेलेल्या तारा. यातून आसमंतात जणू मांगलयतेचे दीप प्रजवलीत झाल्याची प्रचिती आली. 1994 मध्ये ज्या रचनेला ग्रामी अवॉर्डचा सन्मान मिळाला त्या सुरांची जादू रसिकांनी अनुभवली. या अदभूत अविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मोहनविना हे तंतूवाद्य तर तबला आणि पखवाज हे तालवाद्य. या सूर आणि तालेच्या मिश्रणातून साकार झालेल्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली.
हार्मोनियमवर तन्मय देवचक्के, तानपुऱ्यावर मेघोदीपा गांगुली आणि कीर्ती कस्तुरे व तबल्यावर पंडीत सत्यजित तळवलकर यांनी साथसंगत केली. राग बिलासखानी तोडीने कौशिकी यांनी मैफलीला प्रारंभ केला. आपल्या लडिवाळ गायकीतून चारुकेशी रागातील 'हरी गुण गावो' ही बंदिश त्यांनी सुंदरपणे खुलवली. ललित पंचम रागातील बंदीशीचे सादरीकरणही त्यांनी केले. ' आता कुठे धावे मन' या मराठी अभंगाने मैफलीचा समारोप करीत कौशिकी यांनी रसिकांचा पाडवा 'गोड' केला.
'खूप वर्षांनी सकाळची मैफल सादर करण्याची संधी मिळाली आहे. सकाळच्या वातावरणात गाणं ऐकणं ही श्रवणीयतेची अनुभूती देणारे असते. पुणेकरांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे या शहरात नेहमीच कार्यक्रम करायला आवडते'. मी बंगालची असले तरी कर्माने महाराष्ट्रीयन आहे.
- कौशिकी चक्रवर्ती, युवा गायिका