Diwali 2022: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भग्न मूर्ती, जीर्ण प्रतिमा तसेच देवीदेवतांसंबंधित गोष्टींची संकलन मोहीम पुण्यात संपन्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 04:30 PM2022-10-18T16:30:06+5:302022-10-18T16:31:03+5:30
Diwali 2022: देवीदेवतांशी संबंधित जुन्या वस्तू टाकताना नेहमीच अडचण येते, ती दूर करण्यासाठीच संपुर्णम संस्थेच्या सहयोगाने रविवारी पुण्यात त्या वस्तूंचे संकलन करण्यात आले.
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी पुणे शहरात पहिल्यांदा अशाप्रकारची मोहीम सुरू केली. कालची मोहीम ही चौथी मोहीम होती. होती. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे ५०० जणांनी यावेळी वस्तू आणून दिल्या. नाशिकच्या संपूर्णम् संस्थेच्या सहकार्याने या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेे होते.
"आम्हाला मूलबाळ नाही. ह्यांचे नुकतेच निधन झाले. माझ्याच्याने पूजाही होत नाही. म्हणून हे देव योग्य ठिकाणी आणून दिले आहेत."असे एका ८० वर्षीय आजींनी सांगितले.
निगडीहून आलेल्या आजोबांनी देवांची पूजा करून शिऱ्याचा प्रसाद पाणावलेल्या डोळ्यांनी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हाती दिला. "पण मला वाईट वाटत नाहीये. कालाय तस्मै नमः | पण इतकी वर्षं मीच देवपूजा करीत असल्याने भावना गुंतलेल्या असतातच ना. पण आज छातीवरचे ओझे उतरले."
ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे होती. ह्यावेळी आलेल्या प्रत्येक व्यक्तीने माधुरीताईंजवळ आपलं मन मोकळं केलं. पुणे शहरातील धनकवडी, कात्रज, बाणेर, बावधन, पिंपळे सौदागर, कल्याणीनगर, वाघोली इतक्या लांबवरून नागरिक आले होते. तर काही जणांनी महाराष्ट्रातील विविध गावांहून काहींनी पार्सल पाठवून ह्या मोहीमेत आपला सहभाग नोंदविला. एका महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल सगळ्या लोकांनी माधुरी ताईंना दुवा दिला.
पुतळे, मूर्ती, पोथ्या, धार्मिक ग्रंथ, टाक, देव्हारे, फोटो फ्रेम्स, शंभर वर्षांपूर्वीची पार्वती आणि गणपतीची मूर्ती ही यावेळी संकलनात आली. दोन मोठ्ठे टेंपो भरून जमलेले हे सामान दुपारी ४ च्या सुमारास नाशिक कडे रवाना झाले. यावेळी संपूर्णम संस्थेच्या अॅड. तृप्ती गायकवाड उपस्थित होत्या.
ह्या मोहीमेसाठी मुकुंद गोरे, श्रीकांत बागुल, सुधीर जोशी, आशा होनवाड, लता दामले, दीप्ती कौलगुड, लता दामले, तृप्ती कुलकर्णी, अक्षदा देशपांडे, रूपाली वैद्य, दीपाली बोरा, सीमा अंबिके, दामोदर पडवळ व रमण महापुरे यांचे सहकार्य लाभले.