अभिजातता मागून घ्यायची गोष्ट नाही; रवी परांजपे; दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:59 PM2018-02-05T12:59:01+5:302018-02-05T13:04:04+5:30
अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला.
पुणे : सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग आहे संस्कृती. पण हा मार्ग आपण स्वीकारला का? याचे सकारात्मक उत्तर मिळत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसेल तर दोष आपलाच आहे. अभिजातता केंद्र शासनाकडे मागून घ्यायची गोष्ट नाही. तो दर्जा आम्हालाच सिद्ध करण्याची गरज आहे. मात्र ही परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी साहित्य संस्थांना टोला लगावला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या वेळी ‘रत्नाकर पारितोषिक’ मौज दिवाळी अंकासाठी मोनिका गजेंद्रगडकर, रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘ललित’ या दिवाळी अंकासाठी अशोक कोठावळे, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘समदा’ या दिवाळी अंकासाठी संपादिका मनस्विनी प्रभुणे, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘साहित्य शिवार’ या दिवाळी अंकासाठी जयराम देसाई यांना देण्यात आले. त्याचबरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाइन दिवाळी अंकाचे पारितोषिक राम जगताप यांना, ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक’ वर्षा तोडमल आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘अक्षर’मधील ‘आवर्त’ या कथेकरिता विजय खाडिलकर यांना प्रदान करण्यात आले, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘शब्दशिवार’ या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘येडापिसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला’ या लेखाला देण्यात आले. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, तसेच ज्योतिषतज्ज्ञ चंद्रकांत शेवाळे व स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
परांजपे म्हणाले, ‘‘कलात्मक उद्यमशील अभिजातता उदयास आली असती तर वाचक वाढले असते, पण ही कलात्मक अभिजातता वाढली आहे का नाही हे आपण पाहिलेच नाही.’’
वि. दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.
वाचनसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण गरजेचे
प्रा. मिलिंद जोशी यांनी संंमेलनसमाप्तीनंतर ग्रंथप्रदर्शनात २ कोटींची उलाढाल झाली अशा बातम्या येतात, मग वाचकसंख्या कमी का दिसते? याकडे लक्ष वेधून वाचनसंस्कृतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण होण्याची गरज असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना जी लोक दिवाळी अंकांकडे केवळ पैसा कमावण्याच्या हेतूने न पाहता वाचकांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी दिवाळी अंकांची निर्मिती करण्याची धडपड करीत असतात, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षा मनस्विनी प्रभुणे यांनी व्यक्त केली.
‘साहित्य शिवार’चा गौरव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिवाळी स्पर्धेत यंदा चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत श. वा. किर्लोस्कर यांच्या नावाचे उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘साहित्य शिवार’ या दिवाळी अंकाला सन्मानपूर्वक प्रदान केले. रवी परांजपे यांच्या हस्ते ‘साहित्य शिवार’चे संपादक जयराम देसाई यांनी पुरस्कार स्वीकारला.