कालवाबाधितांची ‘दीन’ दिवाळी, मदत न पोहोचल्याने पडक्या घरांमध्येच उजळविले दीप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:51 AM2018-11-05T01:51:08+5:302018-11-05T01:51:44+5:30
‘दिवाळी सण मोठा; नाही आनंदाला तोटा...’ या उक्तीप्रमाणे दिवाळी सण आनंदाची उधळण करत येतो. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कालवाबाधितांची दिवाळी यंदा ‘दीन’वाणी ठरली.
पुणे - ‘दिवाळी सण मोठा; नाही आनंदाला तोटा...’ या उक्तीप्रमाणे दिवाळी सण आनंदाची उधळण करत येतो. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कालवाबाधितांची दिवाळी यंदा ‘दीन’वाणी ठरली.
एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप अनेक बाधितांच्या खात्यात शासकीय रक्कम पोहोचली नाही. घरच नाही तर दिवाळी कुठे साजरी करावी? असा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.
दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी घरांमध्ये घुसले आणि आयुष्यभर कमावलेले सर्व आपल्याबरोबर घेऊन गेले. त्यानंतर प्रत्येक बाधिताला सर्व प्रकारची मदत केली जाईल, अशी आश्वासने देऊन नेते निघून गेले.
आजही अनेकांची घरे मोडलेल्या अवस्थेत आहेत. मोडक्या पडक्या घरात कसेबसे दिवस ते काढत आहेत. कोणीतरी साहेब येईल, आपल्याला मदत देईल, त्यातून पडलेले घर पुन्हा उभे राहील, या आशेवर रस्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, दिवाळीला सुरूवात झाली तरी केवळ २0 बाधितांना घरे मिळाली आहेत. जिल्हा प्रशासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले आहे, अशा भावना बाधितांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
मुन्नी शेख म्हणाल्या, दिवसभर पडक्या घरात बसून किंवा शेजारी बसून आम्ही दिवस काढतो. तर रात्री नातेवाइकांकडे झोपायला जातो. केवळ २0 बाधितांना घरे दिली असून, अनेकांच्या डोक्यावर अजूनही छप्पर नाही. अधिकाºयांकडून पुराव्यासाठी कागदपत्रे मागितली जातात. घराच्या चारही भिंतीबरोबर सर्वच वाहून गेल्यानंतर पुरावे कुठून द्यावेत.
कालवाबाधित धनीराम सरोज म्हणाले, बँक खाते नाही, त्यामुळे अनेकांच्या खात्यात रक्कम जमा करता येत नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.
माझ्यासह अनेकांनी एकदा नाही तर दोन वेळा बँक खात्याची माहिती दिली आहे. मात्र, रक्कम जमा करण्यास टाळाटाळा केली जात आहे. तर बँक खाते हे राष्ट्रीयीकृत बँकेचे असावे असा आग्रह धरला जात आहे.