दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला बूस्टर; २० दिवसांत २२,१७५ वाहनांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:02 PM2023-11-14T12:02:28+5:302023-11-14T12:02:41+5:30
गतवर्षीपेक्षा यंदा २,४३७ वाहने अधिकची विकली गेली. यात दुचाकी १४,५४२; तर चारचाकी ५,१७५ वाहने खरेदी केल्याचे स्पष्ट
पुणे : दसरा आणि दिवाळीचे मुहूर्त साधून वाहने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार यंदा दिवाळीत नागरिकांनी दुचाकी खरेदीला अधिक पसंती दिली आहे. या वर्षी दसरा ते दिवाळी २० दिवसांत शहरात २२ हजार १७५ वाहनांची विक्री झाल्याची नाेंद आहे. गतवर्षीपेक्षा यंदा २,४३७ वाहने अधिकची विकली गेली. यात दुचाकी १४,५४२; तर चारचाकी ५,१७५ वाहने खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा पुणेकरांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना अधिक पसंती दिली आहे. यानुसार दि. २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान पुण्यात एकूण २२,१७५ वाहनांच्या विक्रीची नोंद झाली. महिनाभरापूर्वी वाहनांचे ॲडव्हान्स बुकिंग केले असले, तरी अनेक जण दिवाळीच्या मुहूर्तावरच वाहन घरी घेऊन जातात. यंदाही माेठ्या प्रमाणावर वाहने घरी आणली.
वाहनांची विक्री (२४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान)
दुचाकी : १४,५४२
चारचाकी : ५,१७५
रिक्षा : १,०६३
मालवाहतूक : ७३४
बस : ८२
टॅक्सी : ५७९
एकूण : २२,१७५