दिवाळी फराळ होणार गोड!!! डाळींच्या दरात निम्म्याने घट, तेलही घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:51 PM2017-10-13T16:51:51+5:302017-10-14T11:34:17+5:30
तेल आणि रवा, मैदा, आटा, बेसन, भाजकी डाळ, चणाडाळीच्या दरात घट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी फराळ अधिक गोड होणार आहे.
पुणे : दिवाळी फराळासाठी लागणार्या रवा, मैदा, आटा, बेसन, भाजकी डाळ आणि चणाडाळीच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घट झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी फराळ अधिक गोड होणार आहे. तेल आणि इतर डाळींच्या किंमतीतही काहीशी घट झाली आहे.
संपूर्ण राज्यात दिवाळी हा सण मोठ्या उत्सहात आणि आनंदात साजरा करतात. त्यामुळे या सणासाठी फराळाचे पदार्थही अधिक प्रमाणात घरोघरी तयार केले जातात. दिवाळीच्या काही दिवस आदी फराळाच्या पदार्थांना बाजारात मागणी वाढत असते. परंतु यंदा जीएसटीमुळे सर्वंच पदार्थांचे दर वाढल्याने ग्राहकांनी भुसार बाजाराकडे पाठ फिरवली होती. गेल्या तीन-चार दिवसांत फराळासाठी लागणार्या रवा, मैदा, आटा, बेसन, भाजकी डाळ आणि चणाडाळीच्या दरात मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांची भुसार बाजारात पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. तेलाची आवक चांगली असल्याने मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. त्यामुळे तेलाला मागणी वाढली, तरी दर स्थिर राहणार असल्याची माहिती व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली. विविध प्रकारच्या तांदळाची खरेदी ग्राहकांनी सुरु केली आहे. मात्र नोटाबंदी, जीएसटी, मंदी आदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी खरेदीला येणार्या ग्राहकांची संख्या कमी आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक क्षेत्रातील लोकांचे बोनस झाले नाहीत. त्याचा फटका काही प्रमाणात बसत आहे. मंदीमुळे खरेदीसाठी ग्राहकांनाही काही अडचणी येत असल्याचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले. तर उत्पादन घटल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध होत नाही. साखरेच्या करातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात किलोमागे २ रुपयाची वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विजय गुजराथी यांनी सांगितले.
दिवाळीत रवा, मैदा, बेसन, भाजकी डाळ, पोहा आदीला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. जीएसटीमुळे बाजारात काही काळ मंदी होती. मात्र आता खरेदीला येणार्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. फराळासाठी लागणार्या बहुतांश वस्तूंच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीने घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी अधिक गोड होणार असल्याचे व्यापारी सुमीत गुंदेचा यांनी सांगितले.
फराळासाठी लागणार्या वस्तूंचे तुलनात्मक दर (प्रति किलोमागे)
वस्तूचे नाव सध्याचे दर गतवर्षीचे दर
बेसन ८० रुपये १४० रुपये
चनाडाळ ७० रुपये १४० रुपये
भाजकी डाळ ८५-९० रुपये १६० रुपये
उडीदडाळ ७० रुपये १८० रुपये
रवा २३ रुपये २३ रुपये
मैदा २१ रुपये २३ रुपये
साखर ३७-३८ रुपये ३५-३६ रुपये