दीक्षित रॉयल्स संघाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:02+5:302021-02-16T04:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लायन्स क्लब पुणे रहाटणीतर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतिप्रीत्यर्थ ‘लायन्स करंडक’ प्रौढ (४० वर्षांवरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लायन्स क्लब पुणे रहाटणीतर्फे आयोजित लायन सागर ढोमसे स्मृतिप्रीत्यर्थ ‘लायन्स करंडक’ प्रौढ (४० वर्षांवरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत कर्णधार पुष्कराज जोशीच्या कामगिरीच्या जोरावर दीक्षित रॉयल्स संघाने दादाज इलेव्हन संघाचा ८ गडी व १४.१ षटके राखून सहज पराभव करत विजेतेपद मिळवले.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावरील स्पर्धेचा अंतिम सामना एकतर्फी झाला. दादाज इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५.४ षटकांत ७१ धावा केल्या. यात सतीश सावंत (२४ धावा) आणि महेश दिवटे (१० धावा) यांचे योगदान महत्वाचे होते. दीक्षित रॉयल्सचा कर्णधार पुष्कराज जोशी याने १५ धावांत ४ गडी बाद करून संघाच्या डावाला खिंडार पाडले. हे आव्हान दीक्षित रॉयल्सने ५.५ षटकांत व २ गडी गमावून पूर्ण केले. अमित पार्ले (नाबाद ३६ धावा) आणि विनय निंबाळकर (नाबाद ३२) यांनी सहज विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या हस्ते झाले. या वेळी हेमंत नाईक, भूपेंद्रसिंग धुल्लड, विजय कोतवाल, धीरज कदम, फय्याज लांडगे आदी उपस्थित होते. लायन्स क्लब पुणे रहाटणीचे अध्यक्ष अभिषेक मोहिते यांनी प्रास्ताविक केले. वसंत कोकणे यांनी आभार केले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान ‘दीक्षित’च्या अमित पार्लेला (२१२ धावा) तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा मान सचिन कापडे (कॉसमॉस कल्ट्, १० विकेट) यांना देण्यात आला. स्पर्धेच्या मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान ‘दीक्षित’च्या पुष्कराज जोशी (१२६ धावा व ११ विकेट) याला मिळाला. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान अमित जैन याला देण्यात आला.