Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 18, 2024 06:58 PM2024-09-18T18:58:27+5:302024-09-18T19:00:13+5:30

ऊन वाढल्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, डीहायड्रेशन, भोवळ येणे, उष्माघाताचा त्रास झाला, तर गर्दी वाढल्यामुळे श्वास गुदमरणे, भीतीमुळे रक्तदाबाचा त्रास झाला

Dizziness dehydration shortness of breath More than 600 devotees received medical care during the pune visarjan | Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा

Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा

पुणे : पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक नागरिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. मिरवणुकीमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठांचा सहभाग होता. दुपारी अचानक वाढलेल्या ऊन आणि गर्दीमुळे ६०० पेक्षा अधिक भाविकांना त्याचा त्रास झाला. ऊन वाढल्यामुळे अनेक नागरिकांना उन्हामुळे चक्कर येणे, डीहायड्रेशन होणे, भोवळ येणे, उष्माघाताचा त्रास झाला. तर गर्दी वाढल्यामुळे श्वास गुदमरणे, भीतीमुळे रक्तदाबाचा त्रास झाला. अनेक नागरिकांना ढोल पथकाचे टिपरु लागले. त्यामुळे साधारण ६ नागरिकांना टाके लागले. तसेच ट्रॅक्टर किंवा गाडा ट्रॉली याच्या पत्रामुळे जखमा झाल्या. तर ढोल पथकाने रंगीत धूर सोडणारे फटाक्यांचे फवारे वापरले त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या रंगीत धुरामुळे अनेक नागरिकांना दमा आणि खोकल्याचा त्रास झाला. स्वयंसेवी संस्थांनी वैद्यकीय सेवा पुरविल्यामुळे या नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली.

पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यास, ताराचंद हॉस्पिटल, भारती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता यावरील बेलबाग चौक, ग्राहक पेठ या ठिकाणी चार रुग्णवाहिका, सुविधासहीत ताराचंद हॉस्पिटलचे एकूण ६० डॉक्टर डॉ. नंदकिशोर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते. लक्ष्मी रस्त्यावरील गोखले हॉलजवळ डॉ. बोरसे यांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई, अनिता राठोड, सागर पवार, आशिष जराड, रवींद्र साळुंखे, शमिका होजगे आदी उपस्थित होते. मिरवणूक काळात साधारणतः दोनशे पेक्षा अधिक जणांवर उपचार केल्याची माहिती न्यासाच्यावतीने देण्यात आली.

विजय टॉकीज चौकात मॉडर्न विकास मंडळ आणि स्मार्ट पुणे फाउंडेशनच्यावतीने सर्व सुविधांनी सुसज्ज दोन बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारले होते. याठिकाणी गंभीर अशा चार रुग्णांवर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी कार्डिअक रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी डॉ. संदीप बुटाला व त्यांची संपूर्ण टिम कार्यरत होती. जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने अलका टॉकीज चौकात पुणे पोलिस, पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने सुसज्ज रुग्णकक्ष उभारला होता. या कक्षात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याकरिता ससून हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, ताराचंद हॉस्पिटलमधील डॉक्टर्स सहभागी झाले होते. या कक्षाचा ६०० पेक्षा अधिक भाविक आणि पोलिसांना फायदा झाला. काही रुग्णांना जागेवर उपचार करून सोडण्यात आले तर काही रुग्णांना ताराचंद रुग्णालय ,ससून रुग्णालय आदी रुग्णालयांमध्ये प्रवेशित करण्यात आले.

हा झाला त्रास

- गर्दीमुळे श्वास गुदमरणे .
- ढोल पथकाने रंगीत धूर सोडणारे फटाक्यांचे फवारे वापरले त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या रंगीत धुरामुळे दमा आणि खोकला याचे प्रमाण वाढले
- ट्रॅक्टर किंवा गाडा ट्रॉली याच्या पत्रामुळे होणारे जखमा
- ढोल ताशा वाजवणाऱ्या युवक युवतींना डोक्यामध्ये टिपरू लागून होणारी जखम
- अति आवाजामुळे आणि गर्दीमुळे रक्तदाब वाढणे चक्कर येणे.

मॉडर्न विकास मंडळ आणि स्मार्ट पुणे

फाउंडेशनच्यावतीने १९ वर्षांपासून मिरवणुकीत सेवा देत आहोत. गर्दीमुळे वयस्कर लोकांबरोबर तरुणांनाही त्रास होतात. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असल्याने हा कक्ष उभारला जातो. यावर्षी एकूण ४६ जणांवर उपचार करण्यात आले. दोन बेडचे सर्व सुविधांयुक्त तात्पुरते रुग्णालयही तयार केले होते. त्याचा अनेकांना फायदा झाला. - डॉ. संदीप बुटाला

पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. सुसज्ज रुग्णवाहिका व आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र यांच्या माध्यमातून ११२ डॉक्टर, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी, नर्सेस, स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्यात आली. - डॉ. मिलिंद भोई

Web Title: Dizziness dehydration shortness of breath More than 600 devotees received medical care during the pune visarjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.