आळंदीत लोकसभा निकालानंतर डीजे व फटाके वाजविण्यास बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 05:58 PM2024-06-03T17:58:24+5:302024-06-03T17:58:46+5:30
निकालानंतर डीजे वाजवू नये, फटाके फोडू नये तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये
आळंदी: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी व निकाल उद्या (दि.४) जाहीर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आळंदी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आळंदी पोलिसांनी नागरिकांना विविध नियम लागू केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके म्हणाले, पोलीस ठाणे आळंदी हद्दीतील सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १० मार्च २०२४ पासून ते दिनांक ६ जून २०२४ पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात आहे. संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीचे निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमांद्वारे कोणत्याही समाजांच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये.
निकालानंतर डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक ३ जून ते दिनांक ६ जून या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये 'ओन्ली ऍडमीन' असा बदल करून घ्यावा. जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत. जर ऍडमीन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप अॅडमीनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आळंदी पोलिसांनी दिला आहे.