गणेशोत्सवात डीजे, डॉल्बीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:39 AM2017-08-05T03:39:08+5:302017-08-05T03:39:10+5:30
गणेशोत्सवात पुणे जिल्ह्यात कोठेही डीजे व डॉल्बी वाजविण्याला परवानगी नसल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
लोणावळा : गणेशोत्सवात पुणे जिल्ह्यात कोठेही डीजे व डॉल्बी वाजविण्याला परवानगी नसल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सव जिल्ह्यात शांततेमध्ये व आदर्शवत पार पडावा याकरिता जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील यांची आढावा बैठक नुकतीच पुणे ग्रामीणच्या पाषाण येथील मुख्यालयात पार पडली. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, बारामती विभागाचे अपर अधीक्षक डॉ. संदीप पखाले उपस्थित होते.
नांगरे पाटील म्हणाले, ‘‘डिजेचा कर्णकर्कश आवाज नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याने गणेशोत्सवात कोणालाही डीजे वाजविण्याला परवानगी नाही. मात्र, पोलीस परवाने घेऊन गणेश मंडळाच्या ठिकाणी डेसिबलच्या मर्यादेत स्पीकर लावता येतील. उत्सव काळात समाजविघातक शक्तींकडून घातपात घडविण्याच्या शक्यता असतात. याकरिता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
सीसीटीव्ही हे गुन्हे रोखण्याचे प्रभावी साधन असल्याने गावांमध्येही मुख्य मार्ग व चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. मंडळाच्या ठिकाणी मद्य प्राशन करणे, जुगार खेळणे
असे प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. या वर्षी गणपती व बकरी ईद एकत्र आल्याने जातीय सलोखा राखावा. गणपती विसर्जन रात्री बारापर्वी करावे, असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील व उपस्थित नागरिकांच्या सूचना ऐकून घेत त्यावर कारवाईचे आश्वासन नांगरे-पाटील व हक यांनी दिले.