आंबेडकर जयंतीदिनी डीजे वाजणार नाहीत, मंडळांचे प्रबोधन स्वयंसेवी संस्था करणार
By राजू इनामदार | Published: October 6, 2023 04:08 PM2023-10-06T16:08:21+5:302023-10-06T16:09:19+5:30
गणेशोत्सवात वाजलेल्या डीजेंमुळे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला...
पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजे मुक्त व्हावी यासाठी सार्वजनिक मंडळांमध्ये जाऊन त्यांचे प्रबोधन करण्याचा निर्धार स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गणेशोत्सवात वाजलेल्या डीजेंमुळे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते सुनिल माने यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आंबेडकरी नेते, प्राध्यापक, पत्रकार, डॉक्टर यांचा त्यात समावेश होता. बहुसंख्य वक्त्यांनी डीजे मुळे गणेशोत्सवात झालेल्या त्रासाबद्दल खंत व्यक्त करत यामुळे सर्वसामान्यांचा सार्वजनिक मंडळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्याचे निरिक्षण नोंदवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर पुरूष होते. त्यांच्या जयंतीदिनी तरी असा उन्माद दिसू नये, यासाठी आपणच सर्व मिळून प्रयत्न करू असे बैठकीत एकमताने ठरवण्यात आले.
माने यांनी प्रास्तविक करून आपली भूमिका विषद केली. आंबेडकरी जनतेचे अजूनही शिक्षण,नोकरी असे विविध प्रश्न सुटलेले नाहीत. अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या जयंती निमित्त लोकांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
डीजे आणि लेझरमुळे अनेकांना बहिरेपण येते, अनेकांची दृष्टी जाते तर काही जणांना प्राण गमवावे लागतात. हे बंद व्हावे, यासाठी समाजातील नामवंतांनी प्रयत्न करावा यासाठी बैठक असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार जयदेव गायकवा़ड, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, दलित चळवळीचे अभ्यासक केशव वाघमारे यांनी डीजे मुळे होणारा त्रास असह्य असल्याचे मत व्यक्त केले. सर्वसामान्यांना त्रास देत कोणताही उत्सव किंवा थोर पुरूषांची जयंती साजरी करणे किमान आता तरी थांबायला हवे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही सर्वांनी बैठकीत दिली.
माजी नगरसेवक अशोक कांबळे, सवित्रीबाई फुले विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. मनोहर जाधव, विजय जाधव, डॉ. पवन सोनवणे, नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे विभागप्रमुख डॉ.अविनाश फुलझेले, संजय आल्हाट, माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, निखिल गायकवाड, जितेंद्र गायकवाड, अनिल माने बैठकीत सहभागी होते.