डीएसके यांचा जामीन अर्ज फेटाळला : कोठडीतील मुक्काम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 04:17 PM2018-04-27T16:17:19+5:302018-04-27T16:17:19+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती याचा जामिनाचा अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने अनेकदा मुदत देवूनही ठरलेले रक्कम देवू न शकल्याने डीएसके दांम्पत्याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत अटक केली होती.
पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती याचा जामिनाचा अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे डीएसकेंचा कोठडीत मुक्काम आता आणखी वाढणार आहे. डीएसके यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी बचाव पक्षातर्फे अॅड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तीवाद केला. त्यावेळी सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची वेळी मागीतली होती. त्यानुसार गुरुवारी सरकारी पक्षाचे वतीने अॅड. प्रदीप चव्हाण यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले असून त्यावर आज (शुक्रवारी) आपला निर्णय दिला.
बचाव पक्षाच्या वतीने अॅड. श्रीकांत शिवदे यांनी डीएसके यांच्या वतीने बाजू मांडताना त्यांना जामीन देण्याची मागणी केली. डिएसके यांच्यावर दाखल असलेल्या एकाही गुन्ह्यात सहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नाही. त्यामुळे त्यांच्यावर ४०९ कलम लावण्यात आला. दोषारोपत्र वेळेत न आल्याने ४०९ चा गुन्हा लागत नाही, असे वाटत असेल तर न्यायालयाने त्यांना जामीन द्यावा. डिएसके यांनी आत्तापर्यंत ठेविदारांचे १० हजार कोटी रुपये परत केले आहे. डीएसके यांच्याकडे आत्ता पैसे नसले तरी त्यांचे प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी अनेक पार्टी भागीदारी करण्यासाठी तयार आहेत. मात्र आत्ताच्या वातावरणामुळे ते गुंतवणुक करण्यासाठी घाबरत आहे. तसेच त्यांनी गुंतवणूक करू नये यासाठी देखील काही गट सक्रीय आहे. डीएसके यांनी यापुर्वी देखील अनेक जणांच्या रक्कमा परत केल्या आहेत. उर्वरीत ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी आणि डीएसके यांच्या वयाचा व त्यांना असलेल्या आजाराचा विचार करून त्यांना ६ महिने जामीन देण्यात यावा. या काळात ते त्यांनी काही रक्कम परत केली नाही तर जामीन रद्द करावा, असा युक्तीवाद अॅड. श्रीकांत शिवदे यांनी केला.
दरम्यान डीएसके यांच्याकडे ६ हजार ६७१ ठेविदारांनी ४४८ कोटी ७१ लाखांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. तर त्यांना ४१६ व्यक्ती व संस्थांनी कर्ज दिले असून त्याची रक्कम १२२ कोटी ३८ लाखांच्या घरात आहे. न्यायालयाने वेळोवेळी मुदत देवूनही डीएसके ५० कोटी रुपये जमा करू शकले नाही. तसेच त्यांनी वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल केली. असा व्यक्ती जर जामिनावर सुटला तर ते काहीही करू शकता. तसेच त्यांची पळून जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.डीएसके यांनी वेगवेगळया कंपन्या स्थापन करताना त्या पब्लिक प्रा.लि. नावाने उभारल्या असून त्याद्वारे भागधारकांकडून पैशांची उभारणी केली आहे. त्यामुळे डीएसके कंपन्याचे खरे मालक नसून ते केवळ विश्वस्त असल्याने त्यांनी कंपनी फायद्याचे दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, पदाचा गैरवापर करत त्यांनी भागधारकांचा पैसा व्यैक्तिक कारणाकरिता तसेच स्वत:चे आर्थिक फायद्याकरिता वापरला आहे, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. प्रविण चव्हाण यांनी केला.
काय आहे प्रकारण ?
न्यायालयाने अनेकदा मुदत देवूनही ठरलेले रक्कम देवू न शकल्याने डीएसके दांम्पत्याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत अटक केली होती. त्यांनतर त्यांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. १५ मार्चनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक केलेल्या दिवशीच रात्री कोठडीत पडून जखमी झालेल्या डीएसके यांना ससून व त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात हलविण्यात आले होते. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. या काळात त्यांची १५ वाहने जप्त करण्यात आली होती.