डीएनए चाचणीला लागणार चार दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:40+5:302021-06-10T04:09:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मृतदेह जळाल्यामुळे मृत व्यक्तीच्या हाडातून त्याचा डीएनए सॅम्पल काढण्यास वेळ लागतो. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मृतदेह जळाल्यामुळे मृत व्यक्तीच्या हाडातून त्याचा डीएनए सॅम्पल काढण्यास वेळ लागतो. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांच्या रक्ताशी तो जुळविण्यासाठी आणखी दीड ते दोन दिवस लागतात. त्यामुळे डीएनए प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळपास चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरवडे येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एसव्हीएस कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह पूर्णपणे जळून गेले आहेत. त्यांची ओळख पटविण्याच्या पलीकडे गेल्याने शेवटी डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटविण्यात येणार आहे.
सर्वसाधारण मृतदेह चांगल्या अवस्थेत असेल तर त्याची डीएनए चाचणी पूर्ण करण्यास अधिक वेळ लागत नाही. रक्त आणि हाडातून ही चाचणी केली जाते. पण जळालेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी ही वेळखाऊ असते, अशी माहिती स्वत: डॉक्टर असलेले पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
डीएनएचे विश्लेषण करण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. मंगळवारी सर्वांचे नमुने/ डीएनए औंध येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत जमा करण्यात आले. मृत व्यक्तीच्या हाडातून डीएनए काढला जातो. त्यासाठी दोन दिवस लागतात. त्यानंतर नातेवाईकांच्या रक्तातील डीएनए आरटीपीसआरवर जुळवून घेण्यासाठी एक ते दीड दिवस लागतो. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी २४ तास काम सुरू आहे. तरीही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास ४ दिवस लागू शकतात. त्यामुळे सर्व मृतदेहांची ओळख पटून त्यांचा मृतदेह संबंधितांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास ४ दिवस लागण्याची शक्यता आहे.