पुण्यातील सराफ व्यावसायिकाने साकारली हिंदी भाषेतून ‘ज्ञानेश्वरी’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 08:39 AM2022-08-16T08:39:27+5:302022-08-16T08:39:44+5:30
पुणे : सराफी व्यवसाय सांभाळण्याबरोबरच कृष्णा राजाराम अष्टेकर यांनी शेतीत विविध तंत्रज्ञानाच्या आधारे अभिनव प्रयोग केल्यानंतर थेट लेखनाकडेच मोर्चा ...
पुणे : सराफी व्यवसाय सांभाळण्याबरोबरच कृष्णा राजाराम अष्टेकर यांनी शेतीत विविध तंत्रज्ञानाच्या आधारे अभिनव प्रयोग केल्यानंतर थेट लेखनाकडेच मोर्चा वळविला आणि हिंदीचा फारसा गंध नसतानाही त्यांच्या हातून हिंदी भाषेतील ‘ज्ञानेश्वरी’ साकार झाली. काश्मीरच्या मंदिरात त्यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या ‘मराठवाडी ज्ञानेश्वरी’ चं पठण होत आहे, हे त्यातील विशेष!
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अष्टी हे कृष्णा अष्टेकर यांचे मूळ गाव. ते मूळचे सराफी व्यावसायिक. सराफी व्यवसाय सांभाळता सांभाळता ते शेतीकडे वळले आणि जातिवंत गाईंची खरेदी करून त्यांनी गोशाळेची निर्मित केली. जमिनीचा कस वाढविण्यासाठी त्यांनी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला. शेतात फवारणीपासून, गाईचे तूप विशिष्ट तंत्राद्वारे विकसित करीत प्रत्येक उत्पादनावर त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यांचा हा सराफी व्यावसायिकापासून तंत्रस्नेही शेतकरी होण्यापर्यंतचा प्रवास खरेच थक्क करणारा आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ‘ज्ञानेश्वरी’ हा प्राचीन ग्रंथ हिंदी भाषेमध्ये अनुवादित करण्याच्या ध्येयाने त्यांना प्रेरित केले.
या ग्रंथनिर्मितीविषयी सांगताता कृष्णा अष्टेकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, गुलाबराव महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील ओवीचा अर्थ वाचायचा आणि तो आपल्या कळेल असा भाषेत लिहायचा, असे करीत ही हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरी साकार झाली आहे. या ग्रंथाला संत वाङमयाचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांची प्रस्तावना लाभली असून, त्यांनीही या प्रयत्नाचे कौतुक केल्याचे समाधान आहे. काश्मीरमधील सीमेवरच्या लष्करी जवानांसह तेथील शंकराचार्यांना हिंदीमधील ज्ञानेश्वरीची प्रत भेट म्हणून दिली आहे. मंदिरातल्या पुजाऱ्यांनी आम्ही या ज्ञानेश्वरीतील रोज एका पानाचे पठण करून जम्मू-काश्मीरमधील लोकांना लाऊडस्पीकरवर ऐकवत जाऊ, असे सांगितल्याची आठवणही त्यांनी सांगितली.