मकर संक्रांतीच्या दिवशी आळंदीचे माऊली मंदिर भाविकांसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 09:23 AM2022-01-12T09:23:23+5:302022-01-12T09:26:31+5:30
मंदिर १३ जानेवारी रात्री ८ पासून ते १५ जानेवारी २०२२ सकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णतः बंद
आळंदी : कोरोना रुग्णसंख्येचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तसेच मंदिरात मकर संक्रांती निमित्त महिला भाविकांची देवदर्शनास होणारी गर्दी टाळण्यासाठी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर १३ जानेवारी रात्री ८ पासून ते १५ जानेवारी २०२२ सकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहेत. मात्र मंदिरातील धार्मिक परंपरेचे कार्यक्रम मर्यादित स्वरुपात सुरू राहणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.
आळंदी मंदिरात शुक्रवारी ( दि. १४) मकरसंक्रांत अत्यंत सध्या पद्धतीने मोजक्याच लोकांत साजरी होणार आहे. मकर संक्रांत दिनी आळंदीत महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वाढत्या कोरोंनाचे रुग्ण संख्येमुळे मंदिर प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी भाविकांना मंदिर दर्शनास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान संजीवन समाधी मंदिरात ओवसा वाहण्यासाठी राज्यातून हजारो महिला आळंदीला येत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, इंद्रायणी नदी घाट, आळंदीतील विविध मंदिरांत गर्दी करून देवदर्शन घेत ओवसा वाहत असतात. यापार्श्वभूमीवर उपाययोजनेचा भाग म्हणून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले असून भाविक व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे.
दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र याकाळात श्रींचे नित्याचे उपचार आणि परंपरेने होणारे धार्मिक कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होणार आहे. भाविकांनी युट्युब आणि आळंदी देवस्थानच्या फेसबुक पेजवर थेट श्रींचे दर्शन घेता यावे यासाठी देवस्थानने विशेष सोय केली आहे.