Sanjeevan Samadhi Sohala 2024: 'ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम', संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 03:31 PM2024-11-28T15:31:07+5:302024-11-28T15:33:18+5:30

सोहळ्यात एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री करावे अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली

dnyaneshwar mauli tukaram sant dnyaneshwar maharaj 728 Sanjeevan Samadhi ceremony in Alandi | Sanjeevan Samadhi Sohala 2024: 'ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम', संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

Sanjeevan Samadhi Sohala 2024: 'ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम', संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

भानुदास पऱ्हाड

आळंदी: ''ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम''.... असा जयघोष... दुपारचे बारा वाजले आणि घंटानाद... समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊलीं’च्या जयघोषात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘ श्रीं’चे दर्शन घेतले.
           
तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विना मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन सुरु झाले. यावेळी विनामंडपात कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती.
             
दरम्यान मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ - मृदुंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी  सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत विना मंडपातून कारंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करून ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'' अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान हेलिकॉप्टर मधून माऊलींच्या समाधी मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.


          
संत श्री. नामदेव महाराजांच्या वंशजांनी टाळ - मृदुंगाच्या निनादात नामदेव महाराजांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार केला. यावेळी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी  झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता विना मंडपात ह.भ.प. सोपानकाका महाराज देहूकर यांचे हरीकीर्तन झाले. रात्री उशिरा ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात देवस्थानच्या वतीने नारळ - प्रसाद वाटून त्रयोदशीची सांगता करण्यात आली.  हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी... माऊलींच्या संजीवन सोहळ्यादरम्यान “ज्ञानेश्वर महाराज कि जय”, ‘ज्ञानोबा - माऊली तुकाराम’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.. श्री. ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज कि जय’ असा जयघोष करत हेलिकॉप्टर मधून माऊलींच्या मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री करावे अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. आळंदी येथे संत नामदेव महाराजांचे वंशज, कीर्तनकार व वारकऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन ही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शासकीय वारकरी महामंडळाची स्थापना केली. आषाढी वारीसाठी प्रतिदिंडी वीस हजार रुपये सेवा दिली. वारकऱ्यांसाठी महा आरोग्य शिबिर आयोजित केले. वारीतील वाहनांचा टोल माफ केला. अशी अनेक मदत वारकरी संप्रदायाला त्यांच्या माध्यमातून झाली आहे.

Web Title: dnyaneshwar mauli tukaram sant dnyaneshwar maharaj 728 Sanjeevan Samadhi ceremony in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.