'विठ्ठल-रुख्मिणी'ने केला धावा आणि ज्ञानेश्वराने वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 08:16 PM2019-09-26T20:16:24+5:302019-09-26T20:21:08+5:30
अडचणीत देव कुठल्या रूपात भेटले सांगता येत नाही. याच वाक्याचा प्रत्यय दत्तवाडी भागातील चौघांना आला असून एका तरुणाने जीवाची बाजी लावून त्यांचे प्राण वाचवले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना सांगताना घटनास्थळी असणारी सर्व गर्दी तरुणाचे कौतुक करत होती .
पुणे :अडचणीत देव कुठल्या रूपात भेटले सांगता येत नाही. याच वाक्याचा प्रत्यय दत्तवाडी भागातील चौघांना आला असून एका तरुणाने जीवाची बाजी लावून त्यांचे प्राण वाचवले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना सांगताना घटनास्थळी असणारी सर्व गर्दी तरुणाचे कौतुक करत होती .
बुधवार (दि. २५) रोजी झालेल्या पावसामुळे शहरात चांगलीच दाणादाण उडालेली बघायला मिळाली. काही तासांमध्ये आलेल्या पावसाच्या सरींनी शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. काडी काडी जमवून उभे केलेले संसार डोळ्यासमोर वाहून जाताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. अशाच एका क्षणी जुन्या दत्तवाडीत भागात प्रवेश केला आणि तिथल्या फरशीपुलापासून स्थानिकांची घरं, गाड्याही वाहून गेल्या. त्यामुळे डोळ्यासमोर अनेक नागरिक बेघर झालेली असताना या तरुणाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे यात शंका नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तवाडी भागात ज्ञानेश्वर राऊत हा तरुण राहतो. तिथेच असणाऱ्या प्रेरणा वॊशिंग सेंटरमध्ये काम करत शेजारीच त्याचं घर आहे. बुधवारी पाणी वाढल्यावर त्याने तात्काळ घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.बाहेर पडल्यावर फरशीपुलावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्याला एक मुलगा वाहून आल्याचे दिसून आले. काही क्षण त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला तर मुलगा हातातून निसटून गेला. मात्र पुढे जाऊन तो पत्र्याच्या छतावर अडकला. मुलगा आक्रोश करत होता पण प्रवाह बघून कोणीही आत जाण्यास धजावत नव्हते. पण ज्ञानेश्वरने मात्र काही मागच्या पत्र्यांवर चढून मुलापर्यंत पोचला आणि त्याला वाचवले.
मुलाला घेऊन परतत असताना त्याला पायाखालून 'आम्हाला वाचवा' असा आवाज यायला लागला. तेव्हा त्याच्या जवळच राहणारे क्षीरसागर कुटुंबीय घरात अडकल्याचे त्याच्या लक्षात आले. पती विठ्ठल, पत्नी रुख्मिणी आणि मुलगी मनीषा असे कुटुंब वाचवण्यासाठी हाका मारत होते पण रात्र वैऱ्याची होती. ज्ञानेश्वरने मुलाला सुरक्षित पोचवले आणि तो पुन्हा थांबला. अखेर त्याने प्रयत्न करून पत्रा उचकण्यास सुरुवात केली. आजूबाजूला पाणी आणि वर धुवाधार बरसणारा पाऊस त्यामुळे त्याचे काम अवघड होते. पण अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि तिघेही सुखरूप बाहेर पडले. स्वतःसाठी जगणाऱ्यांच्या जगात दुसऱ्यासाठी जीवावर उदार होणाऱ्या या धाडसी तरुणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
- क्षणभर मलाही भीती वाटली होती पण माझ्यासमोर त्यांना वाचवण्याचे उद्दिष्ट होते. अडचणी येत होत्या पण त्यांचे जीव वाचले याचा अधिक आनंद आहे. आपण सगळे माणसं आहोत एकमेकांना मदत करायलाच हवी.
ज्ञानेश्वर राऊत, धाडसी तरुण
- ज्ञानेश्वर होता म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. आम्ही प्रयत्न करूनही पाण्याच्या लोंढ्यामुळे दार उघडत नव्हते. तो देवदूतासारखा आला. घर सगळे वाहून गेले आहे पण जीव वाचला याचाच आनंद आहे.
रुख्मिणी क्षीरसागर, पाण्यात अडकलेल्या महिला