मुख्यमंत्री महोदय, कोरोनाबाधित मृतांच्या कुटुंबियांसाठी 'ही' माहिती जाहीर करा ; आम आदमी पार्टीची पत्राद्वारे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 04:22 PM2021-06-14T16:22:13+5:302021-06-14T16:27:46+5:30
कोरोनामुळे आपला आधार गमावल्यामुळे अनेक कुटुंबांसमोर आता जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि याच असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा अनेक जण घेत आहे...
पुणे : कोरोनामुळे अनेक कुटुंबांनी आपला आधार गमावला.आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना त्यातच कर्ता माणूस गमावल्यामुळे बऱ्याच कुटुंबांसमोर आता जगायचं कसं असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. मात्र, याच असहाय्यतेचा गैरफायदा घेउन त्यांच्या भावनांशी खेळण्याचे उद्योग काही नतद्रष्ट लोक करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे केंद्र किंवा राज्य शासनामार्फत रुग्णांना किंवा मृत तरुणांच्या कुटुंबीयांना काही सवलती दिल्या जात असल्याबद्दलच्या बातम्या पसरवून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्याचा उद्योग काही लोक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारमार्फत मृत कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या एकत्रित सवलतींची माहिती प्रसिद्ध करावी अशी मागणी आम आदमी पार्टी प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आम आदमी पार्टी प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या पत्रात केंद्र व राज्य शासनाकडून एकत्रित आणि संपूर्ण माहिती नागरिकांना दिली जात नाही.याचाच गैरफायदा घेऊन काही मंडळी रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांशी खेळत आहेत. यातून त्यांना काय मिळतं माहित नाही.कदाचित अशा सवलती मिळवून देण्याच्या बदल्यात काही लाभ पदरात पाडून घेतले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच मागील वर्षी केंद्र शासनाने कोरोनाव्हायरस ही आपत्ती जाहीर करून मृत कोरोना रुग्ण व कोरोना योद्धे यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते.परंतु जाहीर केल्यानंतर काही तासातच केंद्र शासनाने हा निर्णय रद्द केला. निर्णय झाल्याच्या बातम्या आल्या. परंतु रद्द केल्याच्या बातम्या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत.याचाच गैरफायदा घेऊन काही लोक ४ लाख मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून फॉर्म भरून घेत आहे. केंद्र शासनाच्या निर्णयानंतर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सदर योजना पुन्हा सुरू करावी यासाठी केंद्र शासनाला पत्र पाठवले होते.परंतु त्या संदर्भात काही हा विचार झाल्याचे अद्याप तरी ऐकिवात नाही. त्यामुळे लोकांमध्येही गैरसमज पसरत आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून आणि लोकांमध्ये गैरसमज पसरणार नाहीत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अगतिकता, असहाय्य परिस्थितीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये त्यामुळे मृत रुग्ण आणि कोरोना योद्धे यांच्या कुटुंबियांना कोणकोणत्या सवलती आणि लाभ केंद्र व राज्य सरकारमार्फत दिले जातात याची एकत्रित माहिती प्रसिद्ध करावी अशी मागणी कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.