मार्केटिंग करा; पण मूळ संगीत जिवंत ठेवा! गायक हरिहरण यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:51 IST2025-01-14T16:50:42+5:302025-01-14T16:51:31+5:30
ड्रामा करा मात्र स्वरांचा गाभा गमावू नका, कारण स्वर हेच सत्य आहे

मार्केटिंग करा; पण मूळ संगीत जिवंत ठेवा! गायक हरिहरण यांचे आवाहन
पुणे: “आज जगच जणू ‘ड्रामॅटिक’ झाले आहे. ड्रामा करा मात्र स्वरांचा गाभा गमावू नका. कारण स्वर हेच सत्य आहे. मार्केटिंग करा; पण गाभ्यातील संगीत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत राहा,” असे आवाहन प्रसिद्ध गायक हरिहरण यांनी केले.
हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या व विविध संगीत परंपरांना एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘सोल इंडिया’ या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात २७ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टिव्ह फाउंडेशनच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये व स्वरझंकारचे संचालक राजस व तेजस उपाध्ये उपस्थित होते.
हरिहरन म्हणाले, “संगीतातील विविधतेचा आनंद एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांना मिळावा ही या महोत्सवाची मूळ संकल्पना आहे. महोत्सवात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत, गजल, ठुमरी, महाराष्ट्र राज्याचे पारंपरिक संगीत प्रकार व इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक आदी संगीत प्रकारांचा समावेश असेल.” पुण्यातील रसिक प्रेक्षक हे नव्या प्रयोगांबाबत कायम सकारात्मक तर असतातच मात्र मोठ्या मनाने ते अशा प्रयोगांना प्रोत्साहनदेखील देत असतात, त्यामुळे ‘सोल इंडिया’ या महोत्सवाच्या आयोजनाला पुण्यापासून सुरुवात करीत असल्याचे हरिहरन यांनी आवर्जून नमूद केले.
मला कुंभमेळ्यात गायनासाठी निमंत्रण मिळाले आहे, त्यामुळे येत्या १० फेब्रुवारी रोजी मी तिथे गायला जाणार असून, त्यासाठी काही वेगळ्या रचनादेखील बनविल्या आहेत. माझी ९० वर्षांची आईदेखील यावेळी माझ्या सोबत असेल असे हरिहरन म्हणाले.
केरळमध्ये मंदिरात पारंपरिक पेहराव असावा की नसावा यावर हरिहरन म्हणाले, “या सर्व परंपरा काही युगांपासून चालत आल्या असून, जर त्या इतकी शतके सुरू आहेत तर त्यामागे काहीतरी अर्थ असावा हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक गोष्टीत हे बरोबर, हे चूक असा पवित्रा घेऊन चालत नाही. हे सर्व वाद अनाठायी आहेत. प्रत्येक ठिकाणचा विशेष असा पेहराव असतो, त्याच्याशी काही पद्धती, काही भावना जोडलेल्या असतात हे लक्षात घ्यावे. आपण प्रश्न उपस्थित केले म्हणजे आपण शहाणे आहोत, असे असे होत नाही.”