घाबरू नका... पोलीस आहेत!
By admin | Published: November 25, 2015 01:19 AM2015-11-25T01:19:55+5:302015-11-25T01:19:55+5:30
भरवस्तीतील एक चौक...सायंकाळचे सहा वाजलेले... ढग दाटून आल्याने झालेला काळाकुट्ट अंधार..मुसळधार पाऊस...अशा वातावरणात एक धास्तावलेली तरुणी चार-पाच टारगट
हिनाकौसर खान, प्रज्ञा केळकर-सिंग, लक्ष्मण मोरे, पुणे
भरवस्तीतील एक चौक...सायंकाळचे सहा वाजलेले... ढग दाटून आल्याने झालेला काळाकुट्ट अंधार..मुसळधार पाऊस...अशा वातावरणात एक धास्तावलेली तरुणी चार-पाच टारगट मुलांनी छेड काढल्याने आणि अश्लील इशारे केल्याने घाबरलेली ‘ती’ १०९१ क्रमांकावर महिला मदत कक्षाला फोन करून मदतीची मागणी करते...पोलीस मदतीला येणार की नाहीत, आता काय करायचे, अशा विवंचनेत असतानाच अवघ्या १०-१५ मिनिटांत एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचतो, आजूबाजूला चौकशी करतो, नियंत्रण कक्षाकडून मोबाईल क्रमांक मिळवून तरुणीशी संपर्क साधतो आणि आपुलकीने विचारपूस करीत तिला मदतीचे आश्वासन देतो.
महिला अत्याचारविरोधी दिनानिमित्त ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’ मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचा हा दिलासादायक आणि सुखद अनुभव आला. ‘लोकमत प्रतिनिधी’ने १०९१ या मदत कक्ष क्रमांकावर फोन करून, काही मुले पाठलाग करीत असल्याचे आणि छेडछाड करीत असल्याचे कळविले. त्या वेळी कक्षाने तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि काही वेळातच मदत मिळेल, असे सांगितले. त्यानंतर १०-१५ मिनिटांच्या कालावधीत पोलीस कर्मचारी भर पावसात प्रतिनिधीच्या मदतीसाठी धावून आले. घटनास्थळी आल्यावर त्यांनी गस्त घातली, आजूबाजूंच्या दुकानांमध्ये मारामारी, भांडणांची एखादी घटना गेल्या काही वेळात घडली का, याबाबत विचारणा केली. एखादी तरुणी घाबरून आजूबाजूला उभी आहे का, याचीही पाहणी केली.
शहानिशा झाल्यावर, त्यांनी नियंत्रण कक्षाकडून तरुणीचा संपर्क क्रमांक घेऊन तिला फोन केला. तिची भेट घेतल्यानंतर त्याने तिला, ‘घाबरू नको, आम्ही मदतीसाठी आलो आहोत’ असे सांगत दिलासा दिला. मुले कधीपासून पाठलाग करीत आहेत, कशा प्रकारे बोलतात, हावभाव करतात, ओळखीचे आहेत की अनोळखी, गाडीवरून येतात की चालत, अशी सर्व तपशीलवार माहिती घेतली. उद्या मी किंवा माझा सहकारी या वेळेत तुमच्या मागून येऊन त्या मुलांना समज देऊ, गरज वाटल्यास तक्रार दाखल करू, असे सांगत स्वत:चा मोबाईल क्रमांकही दिला. या घटनेने पोलिसांमधील तत्परतेचे आणि त्याचबरोबर संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
एरवी समाजाची पोलिसांबाबतची मानसिकता नकारात्मक असते. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असताना पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि उदासीनतेने पाहत आहेत, असा आरोप केला जातो; मात्र ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये आलेल्या अनुभवाने या समजाला फाटा दिला. सर्व पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी एकाच मानसिकतेचे नसतात, जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे कर्तव्य ते चोखपणे पार पाडतात, याबाबत हा अनुभव आला. छेडछाडीची घटना घडल्यानंतर, आजूबाजूचे लोक केवळ बघ्याची भूमिका घेत मदतीचा हात पुढे करीत नसल्याची खंत पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. सिव्हिल ड्रेसमध्ये जाण्यापेक्षा गणवेश घालून गेल्याने परिस्थिती जास्त लवकर नियंत्रणात येते, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला अत्याचारविरोधी दिन
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दर वर्षी २५ नोव्हेंबर हा स्त्रियांच्या विरोधातील, स्त्रीसंदर्भातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो. स्त्रियांना घरी मारहाण होते, रस्त्यांवर छेडछाडीचा सामना करावा लागतो. जागतिक स्तरावर ३ पैकी १ महिलेला आयुष्यात कधी ना कधी शारीरिक किंवा लैंगिक हिंसा सहन करावी लागते. स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालणे आणि उपाययोजना अवलंबणे, हा या दिनामागील हेतू आहे.