‘वृद्ध कलाकारांना वाळीत टाकू नका’, ‘लोकमत’कडे मांडली व्यथा; पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांची आर्त विनवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:43 AM2018-01-19T03:43:57+5:302018-01-19T03:44:03+5:30
‘आज पुण्यात अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांना काम मिळत नाही. आयुष्य कलेला वाहिले, पण उतरत्या वयात आम्हाला कला क्षेत्रातील कुणीच विचारत नाही.
नम्रता फडणीस
पुणे : ‘आज पुण्यात अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांना काम मिळत नाही. आयुष्य कलेला वाहिले, पण उतरत्या वयात आम्हाला कला क्षेत्रातील कुणीच विचारत नाही. नाट्य संमेलन किंवा कार्यक्रमांनाही निमंत्रण दिले जात नाही. वृद्ध कलाकारांना असे वाळीत टाकू नका,’ अशी व्यथा ज्येष्ठ कलावंत
ज्योती चांदेकर यांनी ‘लोकमत’कडे मांडली. ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘रखेली’सारख्या नाटकांपासून सिंधुताई सपकाळ यांच्या
जीवनावर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेणाºया चांदेकर आज उपेक्षित आहेत.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने दरवर्षी स्नेहमेळावा होतो. या वेळी काही ज्येष्ठ कलाकारांनी ‘लोकमत’कडे आपल्या व्यथा मांडल्या. ज्यांनी ‘गाढवाचं लग्न’ लोकनाट्यातून रसिकांच्या चेहºयावर हास्य फुलविले त्या ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनीही ज्योती चांदेकर यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
तसेच सुहासिनी देशपांडे यांनी पेन्शनची प्रक्रियाच माहीत करून दिली जात नसल्याचे सांगितले. आता वृद्ध झालो म्हणून आम्हाला बाजूला करणे योग्य आहे का, असा सवाल श्रीराम रानडे यांनी केला. आसावरी तारे यांनीही काम आणि मानधन मिळत नसून, आॅर्केस्ट्रामध्ये काम करावे लागत असल्याचे सांगितले.