चुकीची माहिती सोशल माध्यमातून चुकूनही प्रसारित करू नका; ‘डिजिटल सॅनिटाईज’साठी पुणे पोलिसांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:50 PM2020-04-15T13:50:39+5:302020-04-15T14:02:39+5:30
कोरोनाच्या संसर्गाने डोकेदुखी आणखी वाढत चालली असून दुसरीकडे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वांना
पुणे : चुकीची माहिती नागरिकांनी चुकीनेही शेयर करू नये यासाठी सध्या सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. यात पुणे सायबर पोलिसांनीही पुढाकार घेतला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. एखाद्याने चुकीची माहिती सोशल माध्यमातून शेयर केल्यास त्याला होणारी शिक्षा, त्याचे परिणाम याविषयावरील सामाजिक जागृतीपर क्लिप विभागाने प्रसारित केल्या आहेत. हेल्थ सॅनिटाईज होण्याबरोबरच डिजिटल सॅनिटाईज होण्यावर नागरिकांनी अधिक भर द्यायला हवा. असे त्यातून सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या संसर्गाने डोकेदुखी आणखी वाढत चालली असून दुसरीकडे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिक सर्वाधिक प्रमाणात इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. केवळ माहिती घेणे इतकाच या मागील उद्देश नसून अनेकजण जाणीवपूर्वक चुकीची माहिती व्हाट्सएप, फेसबुकच्या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत पोचवत आहेत. यावर सायबर विभागाचा वॉच असून चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांत मोठया संख्येने सायबरचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. नागरिकांना सतत आवाहन करून देखील ते ऐकत नसल्याची खंत सायबरच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापुढील दिवसात नागरिकांनी अधिक सतर्क राहावे यासाठी पुणे सायबर पोलिसांनी जनजागृतीसाठी काही व्हिडीओ शेयर केले आहेत. त्यातुन त्यांनी नागरिकांना आता डिजिटल सॅनिटाईज होण्यासाठी आवाहन केले आहे.
अनेकांकडून एकापेक्षा अधिक सोशल माध्यमांचा वापर होतो. अशावेळी त्यांनी आपल्या कुठल्याही सोशल अकाऊंटवरून चुकीची माहिती पसरवली जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: सोशल माध्यमातून जी माहिती प्रसारित केली जाते ती खरीच असते असे समजू नये. त्याची खात्री करावी. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. खातरजमा न केलेली माहिती ही चुकीची व दिशाभूल करणारी आहे हे लक्षात घ्यावे. अशा पद्धतीने कुणी माहिती प्रसारित करत असल्यास ती व्यक्ती एखाद्या उद्देशाने किंवा आपले लक्ष वेधून घेण्यासाठी संबंधित कृती करत असल्याचे सायबर व्हिडिओद्वारे नागरिकांना सांगण्यात आले आहे.
* तुमच्या चुकीच्या माहितीमुळे काय होऊ शकते ..?
आरोग्याची योग्य काळजी घेतली गेली नाही तर जसा आजार होतो त्याप्रमाणे सोशल माध्यमावर चुकीची माहिती दिल्यास वाचक, दर्शक यांच्या मनात भीती, शंका, संशयास्पद वातावरण तयार होते. जे सर्वाकरिता धोकादायक आहे. तसेच त्यातुन राग, ताण आणि नैराश्य येण्याची भीती आहे. चुकीच्या माहितीने मास हिस्तेरिया, सामूहिक ताण, होण्याची भीती आहे. सध्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट असताना सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी अधिक सजग राहण्याचे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.