मोदींनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते संरक्षण मंत्री झाले : संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:08 PM2017-12-09T13:08:29+5:302017-12-09T14:25:40+5:30
मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.
पुणे : नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.
शिवसेनेची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. या वेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शहर प्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता २०१४ सारखे राहिलेले नसून त्यांच्यात अधिक परिपक्वता, आक्रमकता आली आहे. त्यांचे नेतृत्व पाहता ते नेता वाटतात. दुसरीकडे भाजपा सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असून सरकारने ३ हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. अशाप्रकारे जाहिरातींवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.
स्वातंत्र्यनंतर २३ वर्षांनी वडनगर येथे रेल्वे आली असेल आणि पंतप्रधान सांगतात वयाच्या २०व्या वर्षानंतर देशसेवा करण्यास सुरुवात केली. या वरून त्यांनी चहा विकला का?, असा सवालही त्यांनी केला. नाना पटोले यांच्या भाजपा खासदारकीच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, की नाना पटोले यांनी बाहेर पडणे हे विदर्भाची ठिणगी आहे. हा एक उद्रेक असून त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे. त्यावेळी चॅनेलवर येताच लोक चॅनेल बदलत असत, मात्र आता लोक त्यांची भाषणे पाहत आहेत. भाजपा खासदाराच्या या भूमिकेतून त्यांच्या पक्षात काय चालले आहे, हे दिसत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.